मोदींनी जर देशातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही तर ते स्वत:च स्वत:च्या विनाशाला कारणीभूत ठरतील, असा दावा करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान केले. मथुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबीरात ते बोलत होते.

मोदींनी शेतकऱयांच्या ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवले होते. पण मोदी सत्तेत आल्यानंतरही देशात शेतकऱयांच्या आत्महत्या होत आहेत. मी ज्या ज्या ठीकाणी जातो तेथील शेतकरी मोदींवर केवळ टीका नाही तर त्यांची निंदानालस्ती करताना दिसतात. आश्वासन देऊनही तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. तर, ‘एक श्रेणी एक वेतन’ देखील अद्याप लागू करण्यात आलेले नाही, असे करून मोदी स्वत:च स्वत:च्या विनाशाची कथा लिहीत आहेत. आपण सर्वजण एकत्रितरित्या त्यांचे जेवढे नुकसान करू शकणार तेवढे नुकसान ते स्वत:च करुन घेत आहेत. त्यामुळे मोदींच्या विनाशासाठी आपल्या विरोधाचीही गरज भासणार नाही, असा उपरोधीक टोला राहुल यांनी लगावला.

राहुल यांनी मोदी सरकारसह यावेळी संघावर देखील निशाणा साधला. काँग्रेसची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी नाही. मोहन भागवतांनी आकाश काळ्या रंगाचे आहे असे म्हटले तरी तेथे सर्वजण माना डोलावतात. काँग्रेसमध्ये मात्र तसे नाही. काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून येथे प्रत्येकाची वेगळी विचारधारा आहे. येथे प्रत्येकाचे विचार स्विकारले जातात, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी संघावर टीका केली. येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डीएनएमध्ये काँग्रेस असून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर माझा विश्वास आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने एकत्रित लढा देऊन विरोधकांना काँग्रेस पक्षाची एकी दाखवून देऊ, असेही राहुल या सभेत म्हणाले.