सिंधी, बलोच व पश्तो गटांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्य़ूस्टन येथील हाउडी मोदी मेळाव्याच्यावेळी निदर्शने करण्याचे ठरवले होते.

बलोच अमेरिकी, सिंधी अमेरिकी, पश्तो अमेरिकी समुदायाचे लोक शनिवारीच अमेरिकेच्या विविध भागातून ह्य़ूस्टनला आले आहेत. भारत व अमेरिका यांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून द्यावे अशी त्यांची मागणी आहे. बलोच राष्ट्रीय चळवळीचे नेते नबी बक्ष बलोच यांनी सांगितले की, आम्हाला पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायचे आहे. भारत व अमेरिका यांनी आम्हाला मदत  करावी. भारताने १९७१ मध्ये बांगलादेश निर्मितीत मदत केली होती तशीच आम्हालाही करावी. पाकिस्तान सरकारने बलोच लोकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली केली आहे.

सुमारे शंभर सिंधी अमेरिकी लोक ह्य़ूस्टनला आले असून त्यांनी हाउडी मोदी मेळाव्याच्या ठिकाणी एकत्र जमून मोदी व ट्रम्प यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फलक प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. सिंध मुत्ताहिदा मुहाजचे झफर साहितो यांनी सांगितले की, हा ऐतिहासिक मेळावा असून सिंधच्या लोकांना पाकिस्तानापासून स्वातंत्र्य हवे आहे. भारताने  बांगलादेशला १९७१ मध्ये मदत केली होती. आम्हाला स्वतंत्र सिंध देश हवा आहे. पाकिस्तान हा इश्वरसत्ताक देश आहे त्यांच्यात आम्हाला राहायचे नाही.

मोदींचा काश्मिरी पंडितांशी संवाद

* काश्मिरी पंडितांच्या १७ सदस्यांच्या प्रतिनिधीमंडळाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे ‘विशेष संवाद’ साधला. प्रत्येकासाठी असलेल्या ‘नव्या काश्मीरची बांधणी करण्याचे’ आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी त्यांना दिले.

* संपूर्ण अमेरिकेतून आलेल्या काश्मिरी पंडितांचा समावेश असलेल्या या प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधान ह्य़ूस्टनमध्ये येऊन पोहचल्यानंतर त्यांची भेट घेतली. ‘काश्मीरमध्ये नवे वारे वाहत आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून एका नव्या काश्मीरची बांधणी करू, जे प्रत्येकासाठी असेल’, असे मोदी यांनी या लोकांना सांगितले. तीस वर्षांहून अधिक काळ संयम बाळगल्याबद्दल मोदी यांनी काश्मिरी पंडित समुदायाचे आभार मानले.