पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे भाजपाचे दोन्ही नेते आपल्याच जगात जगत असतात आणि गोष्टींबद्दल कल्पना करीत बसतात, अशा तिखट शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या दोघांवर निशाणा साधला आहे. देशातील सध्याच्या आर्थिकस्थितीवर भाष्य करताना गुरुवारी केरळमध्ये त्यांनी माध्यमांशी बोलताना हे भाष्य केले.

राहुल गांधी म्हणाले, “मिस्टर अमित शाह आणि मिस्टर नरेंद्र मोदी हे आपल्याच कल्पनेच्या दुनियेत जगत असतात. त्यांच्या बाहेरच्या जागाशी काही संबंधच नसतो. आपल्याच जगात जगत असताना ते महत्वाच्या गोष्टींबाबतही कल्पना करीत असतात. त्यामुळे देश सध्या या अडचणीच्या काळातून जात आहे.”

आणखी वाचा- देशाचा घसरता जीडीपी हेच सरकारसाठी ‘अच्छे दिन’ आहेत का? : चिदंबरम

सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून विरोधकांनी सभागृहात मोदी सरकारवर आर्थिंक मंदीवरुन टीका सुरु केली आहे. नुकतेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन राज्यसभेत देशाच्या आर्थिक स्थितीबाबत उत्तर देत असताना यावरुन विरोधी खासदारांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.

मुडीजच्या इन्व्हेस्टर्स सर्विसने म्हटले आहे की, भारतातील आर्थिक मंदीची परिस्थिती अपक्षेपेक्षा बराच काळ कायम राहिली आहे. तसेच सन २०१९ च्या कॅलेंडर वर्षात देशाचा जीडीपी वाढीचा दर हा ५.६ टक्के राहिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी २०१८ मध्ये जीडीपी ७.४ टक्के होता तो २०१९ मध्ये ५.६ टक्के झाल्याचेही या संस्थेने म्हटले आहे.