रशियामध्ये मोदी-शरीफ भेटीचे नियोजन मोदींच्या ‘रमजान’च्या शुभेच्छा संदेशामध्ये दडलेले होते. या आठ मिनिटांच्या संभाषणामध्ये दोघांनीही लवकरच भेटण्यासाठी आश्वस्त केल्याने पाकिस्तान उच्च आयोगाने हुर्रियतला दिलेले इफ्तार पार्टीचे निमंत्रण प्रतीक्षेत ठेवण्यात आले होते.
रमजानच्या पहिल्या दिवशी मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. हा काळ शरीफ यांच्यासाठी खूप कठीण जात होता. शरीफ १६ जूनला पाकिस्तानच्या अर्थसंकल्पावर चर्चा करणार होते. तसेच कराचीमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून त्यांना घेरले जात होते व संसदेबाहेर पंजाबच्या शेतकऱ्यांनी दूध ओतून आंदोलन सुरू केले होते. अशा कठीण प्रसंगी भारताचे पंतप्रधान मोदी यांनी शरीफ यांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
या पाश्र्वभूमीवर दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये चर्चा होत होती. शरीफ मोदी यांच्या शपथविधीसाठी आलेले तेव्हा त्यांनी प्रथम दोन्ही देशांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चा करावी, असे सुचविले होते. ते मान्य करून मोदी यांनी सरताज अझिझ व अजित डोवाल या दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाकच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची परवानगी दिली होती.
वास्तविक दोघेही रशियामध्ये समोरासमोर येणार हे दोघांनाही माहिती होते. यामध्ये काश्मीरमधील दहशतवाद आणि सध्याचे सीमेवरील तणावाचे वातावरण हे दोन मुद्दे चर्चेत असणार होते. या चर्चेमध्ये आणखी तणावाची भर नको म्हणून पाकच्या उच्चायुक्तालयाकडून काश्मीरमधील फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्ससह इतर काही संघटनांना ४ जुलैसाठीच्या इफ्तार पार्टीचे देण्यात आलेले निमंत्रण ऐन वेळी प्रतीक्षेत ठेवण्यात आले. या सर्वाना ‘पार्टी’ पुढे ढकलण्यात आल्याचे २५ जूनला कळविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
रशियातील मोदी व शरीफ यांच्यामधील भेटीचा कार्यक्रम ठरविण्यासाठी पाकिस्तानचे उच्चायोगाचे आयुक्त अब्दुल बशीत आणि भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्यात जून महिन्यात बैठका होत होत्या. यामध्ये भारताने आक्षेप घेतल्याने इफ्तार पार्टी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.