मोदींची लोकप्रियता काही कमी होण्याच नाव घेत नाही आहे. गल्लीपासून दिल्ली पर्यंत फक्त मोदी मोदीच दिसत आहे. यामध्ये आता अजून एका गोष्टीची भर पडली आहे. प्रधान मंत्री ग्रामीण आवास घर योजनेंतर्गत २.८६ लाख लोकांच्या घरांच्या टाईल्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे छायाचित्र झळकणार असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ़ इंडियाने दिले आहे. यात पंतप्रधान मोदींबरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचेही छायाचित्र झळकणार आहे.

या योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक घरांच्या टाईल्सवर नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान छायाचित्र लावण्यात येतील. टाईल्सचा आकार हा मोठा असून या टाईल्स घराच्या मुख्य प्रवेशद्वारवर आणि स्वयंपाकघरात लावण्यात येणार असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. ‘सबका सपना, घर हो आपना’ या घोषवाक्याला साजेशीच अशी टाईल्स असणार आहे.

प्रधान मंत्री ग्रामीण आवास घर योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सर्व घरांवर या दोन नेत्यांची छायाचित्रे लावण्याचे आदेश शहर प्रशासनाने मध्यप्रदेशातील नगर विकासच्या सर्व आयुक्त आणि मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना ४ एप्रिलला दिले आहे.

या घरांसाठी केंद्राकडून सुमारे ५००० कोटी रुपयांचे योगदान देण्यात येणार आहे. योजनेंतर्गत येणारी सर्व घरे शहरी भागात बांधण्यात येणार आहे.

तसेच, राज्य़ातील सर्व आयुक्तांना टाईल्स बसविण्याच्या निविदा काढण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले आहेत.