15 January 2021

News Flash

मोदींनी सबुरीने बोलावे!

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सल्ला

संग्रहित छायाचित्र

 

चीनशी सुरू असलेल्या संघर्षांवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच टिप्पणी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सबुरीने बोलण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या बोलण्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार करूनच नेहमी बोलले पाहिजे, असे ‘मार्गदर्शन’ मनमोहन सिंग यांनी सोमवारी दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेत केले आहे.

पूर्व लडाखमध्ये भारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी केलेली नाही किंवा चिनी सनिकांनी गलवान खोऱ्यातील लष्करी तळ ताब्यात घेतले नाहीत, असे विधान गेल्या शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या विधानाचा चीनने गरफायदा घेत गलवान खोऱ्यावर हक्क सांगितला. मोदी यांच्या विधानावर शनिवारी पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण देत पंतप्रधानांच्या विधानाचा विपर्यास केल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चीनच्या विद्यमान समस्येवर मतप्रदर्शन केले आहे.

गलवान खोऱ्यात १५ व १६ जून रोजी चिनी सनिकांशी झालेल्या संघर्षांमध्ये २० साहसी जवानांनी बलिदान दिले. मातृभूमीसाठी त्यांनी प्राणांची बाजी लावली. हे जवान अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी लढले. या जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल देश कृतज्ञता व्यक्त करतो. पण, कर्नल बी. संतोष बाबू व अन्य शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. त्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले पाहिजे. सरकारकडून त्यापेक्षा कोणतेही कमी योगदान देशाचा विश्वासघात ठरेल. अवघ्या देशाने एकत्रितपणे चीनने केलेल्या दुष्कृत्याला प्रत्युत्तर देण्याची हीच वेळ आहे.

भ्रामक प्रचार कधीही मुत्सद्दी राजकारणासाठी वा सशक्त नेतृत्वासाठी पर्याय असू शकत नाही. दिशाभूल करणाऱ्या, खोटय़ा व अवडंबर माजवणाऱ्या प्रचारामुळे सत्य लपून राहात नाही, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावे, अशी समज मनमोहन सिंग यांनी दिली.

एप्रिलपासून चीन सातत्याने भारताच्या हद्दीतील गलवान खोरे व पँगाँग तळ्याच्या भूप्रदेशात घुसखोरी करून या भूभागावर दावा करत आहे. आपण चीनच्या या धमक्यांना कोणत्याही परिस्थितीत बळी पडू शकत नाही व पडणारही नाही. पंतप्रधानांनी त्यांच्या विधानांचा चीनने गरफायदा उठवू नये यासाठी दक्ष राहिले पाहिजे.

पंतप्रधानांच्या विधानांचा वापर चीनने गलवान खोऱ्यावरील दावा बळकट करण्यासाठी करू नये. या संकटाचा निपटारा करण्यासाठी व हा संघर्ष तीव्र होऊ नये यासाठी सर्व सरकारी यंत्रणांनी एकत्रित काम केले पाहिजे, असेही मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

हे तर शब्दांचे खेळ- नड्डा

मनमोहन सिंग यांच्या सूचनेवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी, ‘माजी पंतप्रधानांची विधाने म्हणजे निव्वळ शब्दांचा खेळ आहे,’ अशी टीका केली आहे. चीनच्या कुटिल नीतीबद्दल ते आत्ता जेवढी चिंता व्यक्त करत आहेत, तेवढय़ा गांभीर्याने मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना विचार केला असता तर अधिक बरे झाले असते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची विधाने ऐकल्यावर मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी देशाचे मनोधर्य खच्ची केले आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात शेकडो चौरस किलोमीटरचा प्रदेश चीनला आंदण देण्यात आला. २०१० ते १३ या तीन वर्षांत चीनने ६०० वेळा घुसखोरी केली, असाही हल्ला नड्डा यांनी चढवला.

पंतप्रधानांची जबाबदारी मोठी – राहुल

‘मनमोहन सिंग यांनी महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला आहे. आत्ता आपण ऐतिहासिक वळणावर उभे आहोत. आपले सरकार जे निर्णय घेईल आणि कृती करेल त्याचा दूरगामी परिणाम पुढील पिढय़ांना भोगावा लागणार आहे. त्या परिणामांच्या उत्तरदायित्वाचे ओझे देशाच्या विद्यमान नेतृत्वावर असते. आपल्यासारख्या लोकशाही देशामध्ये ही जबाबदारी पंतप्रधानांवरच असते. त्यामुळेच पंतप्रधानांनी आपण उच्चारलेल्या शब्दांचे आणि घोषणांचे आपल्या देशाच्या सुरक्षेवर, राजनैतिक व्यवहार-धोरणांवर व भौगोलिक हितसंबंधांवर कोणते दूरगामी परिणाम होऊ शकतात याचा विचार केला पाहिजे, असे मनमोहन म्हणाले. भारताच्या भल्यासाठी पंतप्रधान मोदी त्यांचे म्हणणे ऐकतील अशी आशा करतो,’ असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 12:11 am

Web Title: modi should speak patiently former prime minister manmohan singhs advice abn 97
Next Stories
1 मिझोरममध्ये भूकंप; मोठय़ा प्रमाणात वित्तहानी
2 पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवानास वीरमरण
3 नेपाळमधील नागरिकत्व कायदा भारतविरोधी
Just Now!
X