भारतीय मुस्लीम देशभक्त आहेत, असे विधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने केले असले तरी आपल्या राष्ट्रीय ऐक्याच्या संदेशाला पाठिंबा देण्यासाठी मोदी यांनी संघ परिवाराला जातीयवादी ध्रुवीकरणाला प्रोत्साहन देण्यापासून रोखले पाहिजे, असे मत भाकपने व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदी यांचे भाष्य पंतप्रधानांना साजेसेच होते. परंतु त्यांच्या उक्तीप्रमाणे कृती व्हावयास हवी, कारण तणाव निर्माण करण्यासाठी संघ परिवार धार्मिक फूट आणि तथाकथित ‘लव्ह जिहाद’चा प्रश्न उपस्थित करीत आहेत. भाजप आणि संघाने मोठा प्रचार सुरू केला असल्याने अशा शक्तींना पंतप्रधानांनी थोपवावे, असे भाकपचे सरचिटणीस ए. सुधाकर रेड्डी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यापूर्वी तणाव वाढविणारी वक्तव्ये केली, तर संघ परिवार विखारी प्रचारामार्फत जातीय ध्रुवीकरण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे, असेही रेड्डी म्हणाले.