07 March 2021

News Flash

काँग्रेसने देशाचा आत्मा चिरडला!

आणीबाणीवरून मोदींचे काँग्रेसवर शरसंधान

(संग्रहित छायाचित्र)

‘‘देशाचा विकास कोणी केला, असा प्रश्न वारंवार काँग्रेस नेते विचारतात. मग, हेही सांगा की देशाचा आत्मा चिरडणारी आणीबाणी कोणी लादली? देशाची संसदीय परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न कोणी केला,’’ अशा प्रश्नांची सरबत्ती करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर शरसंधान साधत, देशाचा आत्मा काँग्रेसने चिरडल्याची टीका केली. यावेळी सभागृहात सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक ठरावावरील चर्चेला लोकभेत उत्तर देताना मोदी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आणीबाणीचे काळेकुट्ट दिवस कोणीही विसरू शकत नाही. देशाचा आत्माच तिने चिरडून टाकला. लोकशाही परंपरेवरचा हा काळा डाग कधीच पुसून टाकता येणार नाही.’’

२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. तिला सोमवारी ४४ वर्षे पूर्ण झाली. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, ‘‘आणीबाणीविरोधात जात-धर्माचा भेद विसरून देशवासींनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव केला. आज मतदारांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जातिभेद विसरून भाजपप्रणीत आघाडीला केंद्रात पुन्हा निवडून दिले आहे!’’

‘‘महात्मा गांधींनी स्वांतत्र्यासाठी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू केले होते. त्यात अवघा देश सहभागी झाला होता. तोच जोश नवा भारत निर्माण करण्यासाठी हवा आहे. या कामात विरोधकांनीही सहभागी व्हावे,’’ असे आवाहन मोदींनी केले. सामान्यांना हक्कासाठी व्यवस्थेशी लढावे लागत होते. ‘हे असेच चालणार’ असे लोकांनी गृहीत धरले होते. पण, ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांत केला आहे. २०१४ मध्ये निदान हे सरकार (काँग्रेस) तरी जाईल, या आशेपोटी मतदारांनी आम्हाला मते दिली होती पण, २०१९मध्ये हे सरकार व्यवस्था बदलू शकते आणि सामान्यांचा विकास करू शकते या विश्वासापोटी भरघोस मते दिली आहेत,’’ असे मोदी म्हणाले.

अधिकारापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे असल्याचे पं. नेहरू म्हणत असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले की, ‘‘आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांना अधिकारांचीच चिंता होती. आता कर्तव्याकडे गेले पाहिजे. केंद्रात पुन्हा सत्तेवर येऊन फक्त तीन आठवडे झाले आहेत, पण सरकारने धडाडीने निर्णय घेतले. हे सरकार गरिबांचे असून त्यांच्यासाठीच काम करायचे आहे. म्हणूनच आम्ही आराम केलेला नाही!’’ या शब्दांत निवडणुकीनंतर विश्रांतीसाठी परदेशात गेलेल्या राहुल गांधी यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.

जनकल्याणाच्या जोडीला शेतीविकासात कंपन्यांचे दायित्व, पाणी प्रश्न, रोजगार, शस्त्रास्त्रांची स्वयंनिर्मिती, पर्यटन, स्वच्छता अशा विविध मुद्दय़ांचा ऊहापोह करत मोदींनी नवभारत निर्मितीसाठी सर्वाना एकत्र येण्याचे आवाहन केले.

काहींना तुरुंगात का पाठवले नाही, अशी विचारणा झाली. आम्ही आकसाने कारवाई करीत नाही. शिक्षा देण्याचे काम न्यायालयाचे आहे. ज्यांना जामीन मिळाला आहे, त्यांनी तो एन्जॉय करावा, असा टोमणा त्यांनी लगावला.  भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई कायम राहील, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

दहा वर्षांच्या राजवटीत काँग्रेसने एकदाही वाजपेयी सरकारच्या कामांचा गौरव केला नाही. नरसिंह राव यांचे योगदानही ते विसरले. अधिर रंजन चौधरी यांनी भाषणात मनमोहन सिंग यांचा एकदाही उल्लेख केला नाही. प्रणव मुखर्जीनाही काँग्रेस विसरला. आमच्या सरकारने त्यांना भारतरत्न दिले. आमचे सरकार कोणाचेही योगदान विसरत नाही. आम्ही योगदानाचा पक्षविरहित विचार करतो, असा दावा मोदी यांनी केला. देशाच्या प्रगतीतील योगदानासाठी काँग्रेसला फक्त एका घराण्याचे काम आठवते, असा टोलाही मोदींनी हाणला.

तुम्ही उंचीवरच रहा!

‘‘देशासाठी काँग्रेसचे मोठे योगदान असून काँग्रेसची उंची कोणी कमी करू शकणार नाही,’’ असे काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत मोदींनी काँग्रेसला वास्तवाचे भान नसल्याची टीका केली. ते म्हणाले की, ‘‘तुम्ही इतके उंचीवर गेला आहात की तुम्हाला जमिनीवर काय चालले आहे हे कळेनासे झाले आहे. तुम्ही मुळापासून तुटलेले आहात. तुम्ही आणखी उंच जा, आम्ही तुमची उंची कमी करणार नाही. आमची मुळे खोल मातीत रुतलेली आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. तीच आमची ताकद असून त्याआधारेच आम्हाला देश मजबूत करायचा आहे.’’

निवडणुका जिंकणे आणि हरणे यापलीकडे मी विचार करतो. देशातील लोकांचे अधिकाधिक कल्याण व्हावे, यासाठीच मी प्रयत्न करतो. १३० कोटी नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली, हीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे.

– नरेंद्र मोदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 12:37 am

Web Title: modi speck emergency loksabha abn 97
Next Stories
1 दहा लाखांचे बक्षीस असणारा आरोपी ताब्यात
2 काँग्रेस नेता म्हणाला होता, मुस्लीमांना गटारात रहायचं असेल तर राहू द्या : मोदी
3 अनिल अंबानी इंडोनेशियातील कोळसा खाणही विकणार
Just Now!
X