गुलाम नबी आझाद यांचा आरोप
आसाममध्ये काँग्रेस सरकारने हाती घेतलेल्या विकासाच्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थांबविल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी केला. मोदी यांच्या कृतीमुळेच राज्याच्या विकासावर परिणाम झाल्याचेही ते म्हणाले.
भौगोलिकदृष्टय़ा आसाम हे अडचणीच्या ठिकाणी असल्याने तेथे गुंतवणुकीचा ओघ येत नाही, त्यामुळेच काँग्रेस सरकारने आसाम आणि ईशान्येकडील राज्यांसाठी विशेष योजना हाती घेतल्या होत्या, असे आझाद यांनी येथे एका जाहीर सभेत सांगितले.
उत्तर-पूर्व औद्योगिक आणि गुंतवणूक प्रोत्साहन धोरणामुळे येथे गुंतवणूक येण्यास सुरुवात झाली आणि जनतेला रोजगार मिळू लागला. येत्या काही वर्षांतही लाखोंना रोजगार मिळाला असता, मात्र मोदींनी हे चुकीचे धोरण असल्याचे सांगून योजना थांबविल्या. उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि त्याद्वारे रोजगार उपलब्ध करून देणे हे चुकीचे धोरण कसे, असा सवाल आझाद यांनी केला.
केंद्रातील भाजपचे सरकार आसामविरोधी, जनताविरोधी आणि उत्तरपूर्वविरोधी धोरणे अवलंबीत असल्याचा आरोपही या वेळी आझाद यांनी केला. त्यामुळे मतदारांनी या वेळी आणि तीन वर्षांनंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसलाच मतदान करावे, असे आवाहनही आझाद यांनी केले.