देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दोन माजी राष्ट्रपती, दोन माजी पंतप्रधान तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. देशातील करोनासंदर्भातील परिस्थितीची माहिती मोदींनी त्यांना दिली. पंतप्रधानांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे.

मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, प्रतिभा पाटील तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व एच. डी. देवेगौडा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व मुलायमसिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टालिन, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल, बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याशीही मोदींनी दूरध्वनीवरून चर्चा केली.

स्पेन व ब्राझीलच्या राष्ट्रप्रमुखांशीही संवाद

पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. रविवारी मोदी यांनी स्पेनचे पंतप्रधान तसेच ब्राझीलच्या अध्यक्षांशीही संवाद साधला. युरोपातील इटली आणि स्पेन हे दोन्ही देश सर्वाधिक करोनाबाधित आहेत.