अविश्रांतपणे काम करत असल्याने आपल्यावर टीका होते अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्यांना उत्तर दिले. चीन दौऱ्याचा समारोप करताना शांघाय येथील भारतीय समुदायापुढे शनिवारी बोलताना मोदी यांनी सुटीवरून अप्रत्यक्षपणे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली.
गेल्या वर्षभरात मी एकही सुटी घेतलेली नाही. दिवस-रात्र मी काम केले आहे. मी कोठे सुटीवर गेलो आहे काय असा प्रश्न त्यांनी विचारला.  त्याला राहुल गांधी ५६ दिवस अज्ञातवासात होते त्याचा  संदर्भ होता. सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला तीन मुद्दय़ांवर वचन दिले होते त्याची आठवण मोदींनी करून दिली. यामध्ये न थकता काम करेन, मला जरी केंद्रातला अनुभव नसला तरी गोष्टी शिकेन व वाईट हेतूने कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही. ही तिन्ही आश्वासने पूर्ण केल्याचा दावा मोदींनी केला. न थकता काम करणे हा जर गुन्हा असेल तर तो करत राहीन असे मोदींनी स्पष्ट केले.
सरकारच्या कामगिरीने जागतिक समुदायाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे मोदींनी स्पष्ट केले. गेल्या तीस वर्षांत जे काम व्हायला हवे होते ते झाले नाही; त्यामुळे सरकारच्या पहिल्या वर्षांत ते करण्याचा प्रयत्न केल्याचे मोदींनी सांगितले. त्यामुळे जागतिक समुदायाचा विश्वास बसल्याचे त्यांनी सांगितले.परदेश दौऱ्यात नवे शिकण्याचा प्रयत्न असून, आमच्या सरकारवर वर्षभरात चुकीचे काम केल्याचा आरोप कोणीही करू शकत नाही असे मोदींनी स्पष्ट केले.
काँग्रेसची टीका
दरम्यान, मोदी यांचा चीन दौरा पूर्णत: अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसने केली आहे. परदेशात पंतप्रधान म्हणून जबाबदारीने वावरण्याऐवजी काँग्रेस विरोधकाचीच भूमिका मोदी यांनी बजावली. त्यांनी आता संघाची टोपी डोक्यावरून काढून ठेवावी, असा टोला काँग्रेसने मारला आहे.  अरुणाचल प्रदेशातल्या नागरिकांना चीन देत असलेला स्टेपल्ड व्हिसा त्यांना रोखता आलेला नाही. मात्र तेथील नागरिकांना ते ई-व्हिसा देत आहेत, या विरोधाभासावर काँग्रेसने बोट ठेवले आहे.