पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील संपन्न व सर्वसमावेशक भारत घडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे दिली. डॉ. आंबेडकर यांचा आर्थिक विचार व दृष्टी ही पूर्णपणे समजूनच घेण्यात आली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंती वर्षांनिमित्त सव्वाशे रुपये व दहा रुपये मूल्याची नाणी मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जारी केली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर हे दूरदृष्टीचे नेते होते, विचारवंत होते. त्यांचा आर्थिक विचार आपण नीट समजून घेतला नाही, त्यांच्या सामाजिक न्यायातील कामाला मान्यता मिळाली पण आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या विचारांना प्राधान्य मिळाले नाही, त्याचा अभ्यास केला पाहिजे. सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन भारताची प्रगती व भरभराट करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करील. या कार्यक्रमास अर्थमंत्री अरुण जेटली व सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत उपस्थित होते.
आंबेडकरांनी महिला सक्षमीकरण, संघराज्य बळकटी, अर्थव्यवस्था याबाबत मांडलेले विचार आजही तेवढेचे लागू असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर हे विचारवंत होते, त्यांनी मांडलेले आर्थिक विचारही तेवढेच महत्त्वाचे असून त्यांनी समाजातील सर्व घटकांना घेऊन आर्थिक प्रगती करणे व सामंजस्य निर्माण करणे यासाठी प्रेरणा दिली. डॉ. आंबेडकर यांना अवहेलना सहन करावी लागली पण त्यांची देशभक्ती कामातून दिसत होती असे त्यांनी स्पष्ट केले.