पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातल्या २१ दिग्गज कंपन्यांचे सीईओ भेट यांच्यातली बैठक वॉशिंग्टनमध्ये पार पडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जाणार आहेत. मात्र त्याआधी टॉप २१ कंपन्यांच्या सीईओंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक पार पडली. या बैठकीत ‘मेक इन इंडिया’ मोहीम, ट्रम्प यांचे फर्स्ट अमेरिकेन धोरण, या आणि इतर मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा केली. या चर्चेतून नेमके काय बाहेर येणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र भारताच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे.

जागतिक पातळीवरच्या गुंतवणूकदारांना भारताकडे वळवणे हा या बैठकीमागचा मुख्य उद्देश आहे. आम्ही आमच्या व्यवसाय विषयक धोरणात ७००० सुधारणा केल्या असून गुंतवणूकदारांना भारतात खूप चांगले पर्याय मिळू शकतात, भारताचा विकास झाला तर ती अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांसाठी फायद्याची बाब आहे असेही मोदी यांनी म्हटले आहे. तसेच भारतात लागू होणाऱ्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचाही उल्लेख त्यांनी या बैठकीत केला आहे.

वॉशिंग्टनच्या या बैठकीत अॅपल कंपनीचे प्रमुख टीम कुक, वॉल मार्टचे प्रमुख डाऊग मॅकमिलन, कॅटरपिलर कंपनीचे जिम युम्पलेबाई, गुगलचे प्रमुख सुंदर पिचई, मायक्रोसॉफ्टेच सत्य नाडेला यांसह २१ दिग्गज सीईओंचा समावेश आहे. अमेरिकेत एच बी १ व्हिसा मिळण्यात होणाऱ्या अडचणींशी आता टॉपच्या कंपन्यांना सामना करावा लागतोय. या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सोमवारी नरेंद्र मोदी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील तेव्हा त्यांच्यात या व्हिसाबाबतही चर्चा होईल असा अंदाज व्यक्त होतो आहे.

भारतात लागू होणाऱ्या GST अर्थात वस्तू आणि सेवा करांसंदर्भात गुंतवणूकदारांच्या मनात काही प्रश्न आणि शंका आहेत त्याचे निरसन करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केले आहे. गुंतवणूकदारांना वस्तू आणि सेवा कर किती सोपा आहे आणि त्याचे फायदे काय होऊ शकणार आहेत, हे पंतप्रधानांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे.

सोमवारी होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही भेटीकडे जगाचे लक्ष आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधले द्वीपक्षीय संबंध, चीनची वन बेल्ट वन रोड योजना, दहशतवाद, दहशतवादाला जपणाऱ्या पाकिस्तानविरोधात घ्यायची ठोस भूमिका अशा सगळ्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते पाचव्यांदा अमेरिकेत येत आहेत. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांचीही पहिलीच भेट आहे. या भेटीतून नेमके काय साध्य होणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज झालेल्या दिग्गज कंपन्यांच्या सीईओच्या बैठकीत जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी भारताकडे वळावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.