पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुपारी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या(यूएई) दौऱयासाठी रवाना झाले झाले असून तब्बल ३४ वर्षांनंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान यूएईत दाखल होणार आहे. यापूर्वी १९८१ साली इंदिरा गांधी यांनी यूएई दौरा केला होता. अबू धाबी विमानतळावर दाखल झाल्यानंतर नरेंद्र मोदी तेथील भारतीय कामगारांच्या छावणीला भेट देणार आहेत. यावेळी एक लाखाच्या आसपास भारतीय कामगार तेथे उपस्थित असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. मोदी त्यांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी यूएईमधील सर्वात मोठी मशिद म्हणून ओळखल्या जाणाऱया शेख जायद मशिदीला भेट देणार आहेत. तेथे युवराज शेख मोहम्मद बिन जायद यांच्याशी चर्चा करतील. सोमवारी मोदी दुबईला पोहोचणार असून तेथे पंतप्रधान आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेणार आहेत. जगातील सर्वात मोठी इमारत असलेल्या बुर्ज खलिफा येथेही मोदी जाणार आहेत. झीरो कार्बन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱया मसदर या हायटेक शहराचाही फेरफटका मोदी मारणार आहेत. शेवटच्या टप्प्यात मोदी दुबईच्या क्रिकेट स्टेडियमवरून भारतीयांना संबोधित करणार आहेत.
दरम्यान, गेल्या ३४ वर्षातला भारतीय पंतप्रधानाचा हा पहिला यूएई दौरा असल्यामुळे तेथील भारतीय नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पंतप्रधानांच्या या दौऱयाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे.