मागील काही दिवसापासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमधून समोर येत आहेत. परंतू करोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपाची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

करोना काळात उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीत करोनाबाधित रुग्णांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगींच्या कारभाराचे वाभाडे निघाले असून हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा भाजपाचा प्लॅन तयार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

नक्की वाचा >> जाणून घ्या : कशामुळे सुरु आहे मोदी विरुद्ध योगी वादाची चर्चा?

चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकही योजना उत्तर प्रदेशमध्ये राबवण्यात आली नाही. करोनात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपला पराभव होणार हे भाजपा आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजपा चिंताग्रस्त झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> योगींना मुख्यमंत्री पदावरुन हटवल्यास भाजपा कार्यालयासमोर आत्मदहन करेन; पक्षाध्यक्षांना पाठवलं रक्ताने लिहिलेलं पत्र

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. योगी यांनी शाह यांच्या निवासस्थानी दीड तास चर्चा केली. योगी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अचानक आखण्यात आलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या या दिल्ली दौऱ्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये उलटसुटल चर्चांना सुरुवात झालीय. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर राज्यात नेतृत्वबदल होणार का?, योगी विरुद्ध मोदी असा काही वाद आहे का?, या दौऱ्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी सोशल नेटवर्किंगवर मागील काही दिवसांपासूनच सोशल नेटवर्किंगवर पंतप्रधान मोदी आणि योगींमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

खरोखरच पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांमध्ये काही मतभेद आहेत का हा प्रश्न उपस्थित होण्यामागील महत्वाचं कारण म्हणजे सोशल नेटवर्किंगवर सुरु असणाऱ्या चर्चा. भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी योगींना ५ जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन योगींना शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर या दोन्ही नेत्यांमध्ये काही मतभेद आहेत का अशी चर्चा सुरु झाली. खास करुन भाजपा विरोधकांकडून असा प्रश्न विचारला जात असल्याचं दिसून येत आहे.