हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याने जर्मनीसोबत जे केलं, तेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतासोबत करायचं आहे असं वक्तव्य काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केलं आहे. मल्लिकार्जून खरगे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वांद्रे येथे मुंबई काँग्रेसतर्फे आयोजित संविधान बचाव परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘भाजपाच्या नेतृत्वात देशातील परिस्थिती बिघडत आहे. मात्र काँग्रेस कधीही आरएसएस, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्याप्रमाणे इतर संस्था नष्ट केल्या आहेत त्याप्रमाणे राज्यघटना नष्ट करण्यात यशस्वी होऊ देणार नाही’, असं मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलं आहे.

‘राज्यघटना कोणत्याही ठरविक जात, धर्म किंवा समाजाची नसून प्रत्येक भारतीयाची आहे आणि सर्वांना समान आहे’, असंही ते बोलले आहेत. तसंच भाजपा सरकारने लोकशाहीत कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला आहे का ? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

‘गेल्या चार वर्षांमध्ये भाजपा योग्य दिशेने चार पाऊलं टाकू शकलेलं नाही. त्यांना काँग्रेसकडे बोट दाखवून गेल्या 70 वर्षांमध्ये काय केलं आहे हे विचारण्याचा कोणताही अधिकार नाही’, असं मल्लिकार्जून खरगे बोलले आहेत. खरगे यांनी भाजपा सत्तेत आल्यापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, तसंच वारंवार प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

‘भाजपा देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे अॅडॉल्फ हिटरलने जर्मनीसोबत केलं तेच भारतासोबत करायचं आहे. राज्यघटना धोक्यात असून भाजपा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असून आपल्याला रोखायचं आहे’, असं मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलं आहे.