काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर असून शनिवारी दुसऱ्या दिवशी त्यांनी केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढविला. संपूर्ण कृषी उद्योग आपल्या दोन मित्रांच्या हाती सुपूर्द करण्याची मोदी यांची इच्छा असल्याचा आरोप या वेळी गांधी यांनी केला.

अजमेर येथील रूपनगड आणि नागौरच्या मरकाना येथे गांधी यांनी शेतकऱ्यांच्या दोन मेळाव्यांना संबोधित केले. देशातील ४० टक्के लोक कृषीक्षेत्राशी संबंधित असून त्यामध्ये शेतकरी, लघू आणि मध्यम उद्योजक, व्यापारी आणि कामगार यांचा समावेश आहे, हा संपूर्ण उद्योग आपल्या दोन मित्रांच्या हातात सुपूर्द करण्याची मोदी यांची इच्छा आहे आणि हाच कृषी कायद्यांचा उद्देश आहे, असा दावा गांधी यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता केला.

आपण पर्याय देत असल्याचे मोदी म्हणत आहेत, मात्र भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे ते तीन पर्याय आहेत, असा आरोपही गांधी यांनी केला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह ट्रॅक्टर चालवत गांधी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले.

नागौर येथील सभेत गांधी म्हणाले की, देशाचा कणा मोडला असून त्याची सुरुवात आंदोलनापासून झाली आहे, युवकांचे भवितव्य हिरावून घेतले जात आहे, प्रथम आंदोलन आणि त्यानंतर जीएसटी म्हणजे गब्बरसिंग कर आणण्यात आला आणि छोटय़ा उद्योगांचे कंबरडेच मोडले, असे ते म्हणाले.

शेतकरी, कामगार, व्यापारी यांना दूर करून दोन-तीन उद्योगपतींसाठी मार्ग मोकळा केला जात आहे, टाळेबंदीच्या काळात कामगारांनी मोदी यांना घरी जाण्यासाठी तिकिटे उपलब्ध करून देण्याची विनंती केली, मात्र त्याऐवजी मोदी यांनी धनिकांचे १.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले, असेही गांधी म्हणाले.