काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा हल्लाबोल

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. नागपूरमधील रिमोट कंट्रोलद्वारे ईशान्येकडील राज्यांवर हुकूमत प्रस्थापित करावयाची आणि या राज्यांमधील शांतता आणि संस्कृतीची परंपरा नष्ट करण्याची मोदी यांची इच्छा आहे, असे गांधी म्हणाले.

आसाम, मणिपूर अथवा अरुणाचल प्रदेश येथील कारभार नागपूरच्या रिमोट कंट्रोलद्वारे चालविण्याची मोदी यांची इच्छा आहे, वर्षांनुवर्षे चालत आलेली शांततेची आणि संस्कृतीची परंपरा खंडित करून मोदी यांची केवळ एका ओळीचा विचार लादण्याची इच्छा आहे, असे गांधी येथे काँग्रेसच्या मेळाव्यात म्हणाले.

मोदी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दूरध्वनी करून काँग्रेसने ४० वर्षांत केला नाही तो ऐतिहासिक नागा करार केल्याची माहिती दिली. सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना याबाबत आसाम, नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून याबाबत माहिती घेण्यास सांगितले. मात्र या सर्व मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या कराराबाबत कानावर हात ठेवले, असे राहुल म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनीही याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले, असेही ते म्हणाले. नागा करार करून मोदी यांनी काय साध्य केले, मोदी कोणता विचार करीत आहेत.

पत्रकारांवरील हल्ल्याचा राहुल गांधींकडून निषेध

पतियाळा हाऊस न्यायालयाच्या आवारात सोमवारी पत्रकारांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निषेध केला आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे सर्वस्वी चुकीचे कृत्य असल्याचे गांधी म्हणाले.

ज्या पद्धतीने पत्रकारांवर हल्ला करण्यात आला ते चुकीचे असून आम्ही या घटनेचा निषेध करतो, असे गांधी म्हणाले.

एनडीए सरकार देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संबंधित कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. दिल्ली, हैदराबाद, लखनऊ आणि महाराष्ट्र येथेही केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला असून आम्ही केंद्र सरकारची ही अरेरावी सहन करणार नाही, असे ते म्हणाले.