गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारीला अलाहाबाद येथील कुंभमेळ्याला भेट देणार असून याच दिवशी ते गंगेत डुबकी मारणार आहेत. मोदी यांच्या कार्यालयातील सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील त्रिवेणी संगमावर सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्याला १२ फेब्रुवारी या दिवशी राजकीय आखाडय़ाचे स्वरूप येण्याची शक्यता आहे. या कुंभमेळ्यात हिंदूंचे सर्वोच्च संत व अन्य धर्माधिकारी सहभागी होत असल्याने त्यांच्या उपस्थितीत व आशीर्वादाने मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा विचार भाजप व संघ परिवारातील काही नेते करत आहेत. या शक्यतेमुळे भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या जनता दल युनायटेडमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पाश्र्वभूमीवर, मोदी यांच्या या डुबकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.