पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा वाहणाऱ्या पथकातील एक महत्त्वाचे सदस्य प्रशांत किशोर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मोदी यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासाठी काम करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रशांत किशोर हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांनी संयुक्त राष्ट्र संघातील नोकरी सोडून २०११ मध्ये मोदी यांचा प्रचार करणाऱ्या तरुण व्यावसायिकांच्या पथकात सहभाग घेतला. मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ आणि ‘३ डी’ प्रचारात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
प्रशांत किशोर यांच्यासह अन्य ६० व्यावसायिकांनी मिळून ‘सिटिझन्स फॉर अकाऊण्टेबल गव्हर्नन्स’ (कॅग) स्थापन केली आहे. कॅगने प्रथम मोदींसाठी मते तयार केली आणि त्यानंतर सामाजिक प्रश्न हाती घेतले. सध्या आपण एका वर्षांसाठी विश्रांती घेतली असल्याचे किशोर यांनी सांगितले.