विश्वचषकात भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार असल्याने दोन्ही देशांत औत्सुक्याचे वातावरण असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी याच क्रिकेट शिष्टाईचा वापर करत पाकच्या पंतप्रधानांशी संवाद साधला. नवाझ शरीफ यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरूं संवाद साधत ‘द्विपक्षीय विषय मार्गी लावण्यासाठी’ परराष्ट्र सचिव एस. जयशंकर इस्लामाबादचा दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले. 

‘क्रिकेट डिप्लोमसी’चा वापर करून मोदी यांनी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या चार ‘सार्क’ देशांच्या प्रमुखांना दूरध्वनी करून त्यांच्या संघांना शुभेच्छा दिल्या. यानंतर या देशांसोबतचे नाते दृढ करण्यासाठी जयशंकर हे लवकरच ‘सार्क यात्रा’ करतील, असे मोदी यांनी जाहीर केले. भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तींनी काश्मिरी फुटीरवाद्यांशी चर्चा केल्यामुळे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात होणारी परराष्ट्र सचिवांच्या स्तरावरील बोलणी भारताने ऐनवेळी रद्द केली होती, मात्र या ‘यात्रेत’ जयशंकर पाकिस्तानलाही जाणार आहेत. नवाझ शरीफ यांनी ‘सामायिक हितांच्या सर्व मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी’ भारतीय परराष्ट्र सचिवांच्या प्रस्तावित भेटीचे स्वागत केल्याचे पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांनी इस्लामाबादमध्ये सांगितले.