News Flash

प्लास्टिकमुक्तीवर मोदी यांचा भर

‘जी-७’ परिषदेत भारतातील पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांचे सादरीकरण

(संग्रहित छायाचित्र)

शाश्वत भवितव्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे, जलसंधारण, सौरऊर्जेचा वापर, तसेच वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण याबाबत भारताने मोठय़ा प्रमाणावर केलेल्या प्रयत्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जी ७ परिषदेत पर्यावरणाबाबतच्या सत्रात केलेल्या भाषणात भर दिला.

फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विशेष निमंत्रणावरून मोदी हे फ्रान्सच्या बियारित्झ शहरात होत असलेल्या जी ७ परिषदेला उपस्थित आहेत.

जैवविविधता, सागर व हवामान या विषयांना समर्पित जी ७ परिषदेतील सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला. या संदर्भातील जागतिक आव्हानांचा सामना करण्यात भारताच्या बांधिलकीचा त्यांनी पुनरुच्चार केला. हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि सागरी प्रदूषण कमी करण्यात भारताचे योगदान त्यांनी अधोरेखित केले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

दरम्यान, पंतप्रधान  मोदी यांनी जी ७ शिखर बैठकीच्या पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस  यांच्याशी चर्चा केली. रविवारी झालेली ही चर्चा फलदायी झाल्याचे सांगण्यात आले. विविध प्रश्नांवर दोघांनी चर्चा केली असून हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठीच्या प्रयत्नांवरही त्यात भर देण्यात आला.

मनामा येथून पंतप्रधान मोदी यांचे बियारित्झ येथे आगमन झाले तेव्हा त्यांनी गट्रेस यांच्याशी चर्चा केली. हवामान बदलासह महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे. भारताने काश्मीरमधील कलम ३७० काढून घेतल्यानंतर गट्रेस व मोदी यांची ही पहिलीच भेट होती.  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी गट्रेस यांची भेट घेऊन त्यांना जम्मू काश्मीरमधील गुंतागुंतीच्या व नाजूक परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर एक दिवसाने मोदी यांनी गट्रेस यांची भेट घेतली. कलम ३७० काढून घेतल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत भारत व पाकिस्तान यांनी  संयम पाळून शांतता राखावी असे आवाहन गट्रेस यांनी याआधी केले होते.  कलम ३७० रद्द क रणे ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे भारताने स्पष्टपणे सांगितले होते. गट्रेस यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांना असे सांगितले होते की, तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करण्यास आपण नेहमीच तयार आहोत, तसेच फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी यांची भेटही होणार आहे.

‘चर्चा फलदायी’

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीट संदेशात विविध विषयांवरची ही चर्चा फलदायी झाली असल्याचे म्हटले असून संयुक्त राष्ट्रांच्या हवामान कृती शिखर बैठकीत भारताचा सहभाग तसेच परस्पर हिताचे मुद्दे यावर चांगली चर्चा झाल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविशकुमार यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:04 am

Web Title: modis emphasis on plastic ban efforts abn 97
Next Stories
1 अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वणवे विझविण्यास जी-७ देशांची मदत
2 महाराष्ट्र, झारखंडमध्ये ‘संयुक्त जद’ला ‘बाण’ चिन्हाच्या वापराला मनाई
3 आरबीआय केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी देणार
Just Now!
X