भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा गंगा आरतीचा कार्यक्रम धार्मिक नसून राजकीय असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी केली. सिकंदरपूरमध्ये एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी मोदी आणि भाजपवर हल्ला केला.
ते म्हणाले, गंगेची आरती करण्याचा मोदींचा कार्यक्रम हा पूर्णपणे राजकीय स्वरुपाचा आहे. उत्तर प्रदेशात केवळ जातीयवाद निर्माण करण्याचा भाजपचा हेतू आहे. त्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत देशात १५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. देशात अशी अनेक राज्ये आहेत की जिथे भाजपचे अजिबात अस्तित्त्व नाही. पण त्याचवेळी तिसऱया आघाडीतील पक्षांचे प्रत्येक राज्यात स्थान आहे. त्यामुळे मतमोजणीनंतर देशात तिसऱया आघाडीचेच सरकार अस्तित्त्वात येईल, असेही भाकीत अखिलेश यादव यांनी केले.