भारतातील आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, संरक्षण, कृषी व विमा क्षेत्रात अमेरिकी कंपन्यांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-भारत व्यापार मंडळाच्या ‘इंडिया आयडीयाज समिट’ कार्यक्रमात केले. दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत ते म्हणाले की, भारतात खुलेपणा, चांगले प्रशासन, संधींची विपुलता आणि गुंतवणुकीचे पर्याय अनेक आहेत.
उत्पादकता वाढ, अर्थव्यवस्थेची स्थिती व आंतरराष्ट्रीय व्यापारातील बदल या गोष्टीतून आपण आवश्यक आर्थिक लवचीकता मिळवू शकतो. भारत हा वाढत्या संधींचा देश आहे. खुल्या बाजारपेठा म्हणजे जास्त संधी असे समीकरणच आहे. आमच्या सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात आम्ही भारतीय व्यवस्था खुली व सुधारणाभिमुख केली आहे. त्यामुळे सकारात्मक बदल घडून आले, असे त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी याच बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी बीजभाषणात सांगितले की, भारत हा अमेरिकेचा मोठा संरक्षण व सुरक्षा भागीदार आहे. पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचे चीनचे वर्तन अस्वीकार्य असल्याचे सांगून सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षच या प्रक्षोभक कारवायांना जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताचे वीस सैनिक चीनच्या हिंसाचारात मारले गेले यामुळे अमेरिका व्यथित असल्याचे सांगून त्यांनी दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करून हितसंबंध जपू शकतात असे स्पष्ट केले. चीनची ५९ उपयोजने(अॅप) हद्दपार करण्याच्या भारताच्या निर्णयाचे त्यांनी पुन्हा एकदा स्वागत केले. टिकटॉकसह ही सर्व उपयोजने भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
करोनाच्या संकटाने आपल्याला आर्थिक लवचीकतेचे महत्त्व जाणवून दिले, देशांतर्गत आर्थिक क्षमतांच्या मदतीनेच आपण यात टिकू शकतो. भारत हा वाढत्या संधींचा देश आहे.
– नरेंद्र मोदी , पंतप्रधान
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 12:22 am