पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करण्यात आल्याची खबर मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ तीन तास चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये मश्गूल होते, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा केली.

या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला वेदना होत होत्या, शहीद जवानांच्या घरातील स्थितीही वेगळी नव्हती. असे असताना मोदी मात्र पाण्यामध्ये सुहास्य वदनाने चित्रीकरण करीत होते, असे गांधी यांनी ‘फोटोशूटसरकार’ या हॅशटॅगखाली ट्वीट केले आहे. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याची खबर आल्यानंतरही तीन तास प्राइम टाइम मिनिस्टर चित्रीकरणामध्ये व्यस्त होते, असे गांधी यांनी हिंदीमध्ये ट्वीट केले आहे.

हल्ल्यानंतरही मोदी सायंकाळपर्यंत चित्रीकरणात व्यस्त होते, असा आरोप गुरुवारी काँग्रेसने माध्यमातील वृत्ताच्या हवाल्याने केला. सायंकाळी सात वाजता मोदी यांनी समोसा आणि चहाचा आस्वाद घेतला, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

दरम्यान भाजपाकडून खंडन या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चित्रीकरणातच दंग होते, या काँग्रेसने केलेल्या आरोपाचे भाजपने जोरदार खंडन केले आहे. हे धादांत खोटे वृत्त असून चित्रीकरण सकाळीच करण्यात आले होते, असेही भाजपने स्पष्ट केले आहे. राहुल गांधी, तुमच्या खोटय़ा वृत्तांमुळे भारत त्रस्त झाला आहे, सकाळी काढण्यात आलेली छायाचित्रे दाखवून देशाची दिशाभूल करणे थांबवा, हल्ल्याची कल्पना कदाचित तुम्हाला आधीच असेल, जनतेला सायंकाळीच त्याची माहिती मिळाली, असे भाजपने ट्वीट केले आहे.