आपल्या बांगलादेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला, त्याबद्दल पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोदी यांचे वक्तव्य द्वेष पसरविणारे असून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेले असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे.
भारतातील दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालत असल्याचे मोदी यांनी केलेले विधान खेदजनक असल्याचे मत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केलेले असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार सरताज अझिझ पार्लमेण्टमध्ये भाषण करताना भारताविरुद्ध अधिकच आक्रमक झाले.
दहशतवादाच्या मार्गाने पाकिस्तानात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्यात आणि पूर्व पाकिस्तान वेगळे होण्यात भारताची भूमिका होती, हे उघड करण्यासाठी पाकिस्तान सर्वतोपरी पावले उचलेल, असा कांगावा
सरताज अझिझ यांनी केला आहे.
मोदी यांच्या वक्तव्यामुळे भारताच्या १९७१ मधील भूमिकेवर शिक्कमोर्तब झाले असून त्याची यापूर्वीच दखल घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची स्पष्ट कबुली भारताने दिली, त्याची आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रसंघाने दखल घ्यावी, अशी विनंती अझिझ यांनी केली आहे. मोदी यांनी बांगलादेशात जाऊन पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील संबंध दुरावतील असे वक्तव्य करावे हे खेदजनक असल्याचे अझिझ यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरबाबत भारत संयुक्त राष्ट्रसंघातील ठरावाचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप अझिझ यांनी केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे या भारताच्या दाव्याच्या विश्वासार्हतेबद्दलही अझिझ यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.