मुख्यमंत्र्यांना डावलल्याने काँग्रेसची नाराजी

मुख्यमंत्री ओमान चंडी यांना कार्यक्रमातून वगळल्यामुळे वादाचा विषय बनलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केरळ दौरा सोमवारपासून सुरू होत आहे. येथील इझावा समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास मोदी हजेरी लावणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लोकांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवरील कार्यक्रम आटोपल्यानंतर मोदी इझावा समुदायाचे दिवंगत नेते व केरळचे माजी मुख्यमंत्री आर. शंकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. याच कार्यक्रमावरून वादंग उठले आहे. तो आयोजित करणाऱ्या ‘श्री नारायण धर्म परिपालन योगम’ संघटनेचे सचिव वेलापल्ली नटेशन यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला चंडी यांना हजर न राहण्याविषयी विनंती केली होती. आयोजकांनी याबाबतीत कोतेपणा दाखविला असून पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला हजर राहू नये, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मुख्यमंत्रिपदासारख्या घटनात्मक पदाचा हा अवमान असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. दरम्यान, मोदी कोची येथे ‘आयएनएस विक्रमादित्य’वर होणाऱ्या लष्करी कमांडर परिषदेत सहभागी होणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.