भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अल्पसंख्याकांबरोबर कसे वागायचे हे शिकवू, असे वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने चांगलेच फैलावर घेतले आहे. ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भारतावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या इम्रान खान यांना कैफने ट्विटवरून सडेतोड शब्दात उत्तर दिले आहे.

कैफने इम्रान खान यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांची आकडेवरीच त्यांना ऐकवली आहे. कैफ आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ‘भारत-पाकिस्तान फाळणी झाली होती त्यावेळी पाकिस्तानमध्ये २० टक्के अल्पसंख्यांक होते. आज हाच आकडा केवळ दोन टक्क्यावर आला आहे.’ पुढे बोलताना भारतामधील अल्पसंख्यांकांची संख्या वाढल्याचेही कैफने म्हटले आहे. ‘पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची संख्या कमी होत असतानाच दुसरीकडे भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्यांकांची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे’, असंही कैफ म्हणाला. शेवटच्या ओळीमध्ये कैफने इम्रान यांना सणसणीत टोला लगावत, ‘अल्पसंख्यांकाना कसे वागवावे याबद्दल भाष्य करायचे झाल्यास पाकिस्तान हा देशातील शेवटचा देश असेल जे याबद्दल बोलू शकतील.’ असं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी बुलंदशहर येथे गोहत्याच्या अफवेवरुन हिंसाचार झाला होता. यावरुन ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही या वादात उडी घेतली. इमरान खान यांनी शाह यांच्या वक्तव्याला मोहम्मद अली जिना यांच्या वक्तव्याशी जोडले. त्यामुळे नसीरूद्दीन शाह चांगलेच भडकले. शाह यांनी संडे एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मला वाटतं, मिस्टर इमरान खान यांनी त्याच मुद्यावर भाष्य केले पाहिजे, जे त्यांच्या देशाशी संबंधित आहे. ज्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही, त्यावर त्यांनी बोलू नये. मागील ७० वर्षांपासून आमच्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे आमची काळजी कशी घ्यावी, हे आम्हाला समजते असा टोला शाह यांनी लगावला होता.

या व्यतिरिक्त सर्व समावेशक राजकारण आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकाराबद्दल पाकिस्तानला भारताकडून शिकलं पाहिजे असं सांगत एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला होता.