सरसंघचालकांचे जेएनयू प्रकरणी टीकास्त्र

‘भारत माता की जय’ असे म्हणणारे लोक आपल्याकडे कमी असून ते शिकवण्याची वेळ आलेली असताना, मात्र असे बोलू नका, असे सांगणाऱ्यांची संख्या देशात वाढत असल्याची खंत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. एक प्रकारे जेएनयू प्रकरणावर टीका केली आहे.

संत गजानन महाराज श्रद्धास्थानातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते मातृशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला कौटुंबिक न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मीरा खडक्कार उपस्थित होत्या.   देश महाशक्ती होत असताना मातृशक्तीचा मात्र सन्मान करण्याची वेळ असून तो मात्र होत नाही, अशी परिस्थिती आज नाही. देशात खरे तर मातृशक्तीचे महत्त्व पटवून देण्याची गरजच नसावी. घरातील मातेपासून मातृभूमीपर्यंत मातेचा जयजयकार करणे हे स्वाभाविकच असायला हवे. मात्र, आज तसे होताना दिसत नाही. देशात भारत माता की जय हे शिकवावे लागत असताना मात्र असे बोलू नका म्हणणाऱ्यांची संख्या वाढताना जास्त दृष्टीस पडत आहे. जेएनयू प्रकरणासंदर्भात सरसंघचालकांनी कुठलेही वक्तव्य केले नसले तरी त्यांनी देशविरोधी घोषणा देणाऱ्यांविरोधात अप्रत्यक्षपणे टीका केली.