सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यात गेल्या एक वर्षांपासून सुरु असलेल्या वादानंतर या दोघांना आता सुटीवर पाठवण्यात आले आहे. विशेष गोष्ट म्हणजे या वादात पुन्हा एकदा मोईन कुरेशीचे नाव प्रामुख्याने समोर आले आहे. सीबीआयचे तत्कालीन प्रमुख ए पी सिंह आणि रंजीत सिन्हा यांच्या पतनासही मोईन कुरेशी हाच जबाबदार होता. अशावेळी तीन सीबीआय प्रमुखांची प्रतिमा मलीन करण्यामागील ही व्यक्ती कोण आहे आणि एका प्रकरणामुळे सीबीआयमध्ये कसे वादळ निर्माण झाले हे जाणून घेणे रंजक आहे.

मोईन अख्तर कुरेशी

मोईन कुरेशी हा मुळचा उत्तर प्रदेशमधील कानपूरचा आहे. त्याने १९९३ मध्ये रामपूर येथे एक छोटासा कत्तलखाना सुरु केला होता. त्यानंतर लवकरच तो देशातील सर्वांत मोठा मांस निर्यातदार बनला. मागील २५ वर्षांत त्याने बांधकाम आणि फॅशनसह अनेक क्षेत्रात २५ हून अधिक कंपन्या सुरु केल्या.

त्याने आपले शिक्षण डून स्कूल आणि सेंट स्टिफन्समधून पूर्ण केले होते. त्याच्याविरोधात कर चोरी, मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लावण्यात आले, चौकशीही झाली. त्याचबरोबर हवालाच्या माध्यमातून मोठ्या रकमेचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. सीबीआयचे अधिकारी, राजकीय नेते आणि इतर अधिकाऱ्यांना लाच दिल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

२०१४ मध्ये कुरेशीचे नाव पहिल्यांदा समोर आले. त्याने १५ महिन्यांमध्ये किमान ७० वेळा तत्कालीन सीबीआय प्रमुख रंजीत सिन्हा यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. आलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यात सध्या सुरु असलेल्या वादात हैदराबादचा उद्योगपती सतीशबाबू सनाचेही नाव समोर आले आहे. सनाने सीबीआयच्या एका प्रकरणात अडकलेल्या आपल्या मित्राच्या जामिनासाठी १ कोटी रुपये कुरेशीकडे दिले होते, असे मागील वर्षी अंमलबजावणी संचालनालयाच्या (इडी) चौकशीत सांगितले होते.

आरोपी किंवा संशयिताची भेट घेण्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने रंजीत सिन्हा यांना फटकारले होते. त्यानंतर सीबीआयच्या रडारवर ते आले होते. रंजीत सिन्हा २०१२ ते २०१४ पर्यंत सीबीआयचे प्रमुख होते. त्यांनी सातत्याने हे आरोप नाकारले.

त्यानंतर २०१४ मध्ये कुरेशी आणि सीबीआयचे आणखी एक संचालक ए पी सिंह यांच्यात संदेशाची देवाण-घेवाण होत असत. ए पी सिंह २०१० ते २०१२ पर्यंत सीबीआयचे प्रमुख होते. प्राप्तिकर विभाग आणि इडीने या प्रकरणाची चौकशी केली आणि मागीलवर्षी फेब्रुवारीमध्ये सीबीआयने सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. कुरेशीबरोबरी सिंह यांच्या संबंधांची चौकशी होईल. आरोपांमुळे सिंह यांना लोकसेवा आयोगाचे सदस्यपद गमवावे लागले होते. ए पी सिंह यांनीही सातत्याने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

आता वर्मा विरुद्ध अस्थाना प्रकरणातही नाव

कुरेशीच्या चौकशीप्रकरणी आता आलोक वर्मांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. बुधवारी सरकारने त्यांच्याकडील सर्व अधिकार काढून घेतले आहेत. अस्थाना यांच्या आरोपानुसार, कुरेशी प्रकरणात दिलासा देण्यासाठी वर्मा यांनी सनाकडून २ कोटींची लाच घेतली आहे. तर वर्मा यांनी अस्थाना यांच्याविरोधात मागील आठवड्यात गुन्हा दाखल केला आहे. अस्थाना यांनी सनाकडून ३ कोटींची लाच घेतल्याचा यात आरोप आहे.