14 December 2017

News Flash

आई.. मला जगायचंय

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेत मरण पावलेल्या त्या तरुणीची जीवनेच्छा शेवटपर्यंत प्रबळ होती. जेव्हा तिला

नवी दिल्ली, पीटीआय | Updated: December 29, 2012 7:09 AM

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेत मरण पावलेल्या त्या तरुणीची जीवनेच्छा शेवटपर्यंत प्रबळ होती. जेव्हा तिला सफदरजंग रुग्णालयात ठेवले होते तेव्हा तिची आई व भाऊ तिच्याजवळ होते. तेव्हा तिने एका चिठ्ठीवर संदेश लिहिला होता, आई मला जगायचंय. पण तिची ही जगण्याची असोशी अखेर आज संपली. बलात्काराच्या घटनेनंतर १९ नोव्हेंबरला म्हणजे तीन दिवसांनी तिला तिची आई व भाऊ भेटले. तिच्यावर बलात्कार तर झालाच पण तिला ज्या क्रूरपणे जखमी केले गेले त्याबाबत डॉक्टरांनीही असे क्रौर्य आम्ही कधी पाहिले नव्हते, अशी प्रतिक्रिया दिली होती. तिच्यावर उपचार करणारी नर्स तिला पाहून ढसढसा रडायची, इतकी तिची अवस्था वाईट होती. तिच्यावर उपचार सुरू असताना तिने सतत खाणाखुणांच्या मदतीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिच्याबरोबर असलेला तिचा सहकारीही तिला भेटला तेव्हा तिने गुन्हेगार पकडले गेले का, असा प्रश्न विचारला होता. या मित्राची खुशालीही विचारली होती. तिच्या आईवडिलांशी ती बोलत होती. दंडाधिकाऱ्यांपुढे तिने एकदा नव्हे दोनदा निवेदनही केले. पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेली ही तरुणी स्वप्नाळू होती. दहा दिवसांच्या उपचारात तिने मानसरोगतज्ज्ञांना जे काही सांगितले त्यावरून तिची जीवनाविषयी काही स्वप्ने होती. २१ डिसेंबरला तिने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांपुढे निवेदन केले. घडलेल्या घटनेची बारीकसारीक माहिती, घटनाक्रम तिने सांगितला. तिच्या मित्राने दिलेल्या माहितीशी ते सगळे जुळणारे होते. जेव्हा या निवेदनावरून वाद झाला तेव्हा पुन्हा तिने दंडाधिकाऱ्यांपुढे हकीगत कथन केली. मानसिकदृष्टय़ा ती कणखर होती व भविष्याविषयी आशावादी होती.  दोन दिवस तिला कृत्रिम श्वासावर ठेवले होते. ख्रिसमसच्या रात्री तिची प्रकृती आणखी गंभीर बनली. त्यानंतर तिला सिंगापूरला हलवण्यात आले.

First Published on December 29, 2012 7:09 am

Web Title: mom i want to live
टॅग Delhi Gangrape