ब्लू व्हेल या गेमनंतर त्यासारखाच मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम सध्या धुमाकूळ घालत आहे. त्याचा पहिला बळी भारतात गेल्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजस्थानमधील अजमेर येथे दहावीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीचा या खेळामुळे बळी गेला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लहान मुलांच्या जिवावर बेतणारा हा गेम अतिशय धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. या मुलीने फास लावून आत्महत्या केली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी या आत्महत्येमागे मोमो चॅलेंज या खेळाचाच हात असल्याचा दावा केला आहे.

या मुलीच्या मैत्रिणीने मुलीच्या भावाला सांगितले, की ती मोमो चॅलेंजच्या शेवटच्या राऊंडमध्ये पोहचण्यासाठी अतिशय उत्सुक होती. तर या मुलीच्या भावानेही आपली बहीण घरी शाळेतही मोकळ्या वेळात मोमो चॅलेंज हा गेम खेळत असायची. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, आत्महत्या करण्यापूर्वी या मुलीने हाताची नसही कापून घेतली. या मुलीच्या इंटरनेट हिस्ट्रीची तपासणी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे चॅलेंज सध्या जगातील अमेरिका, अर्जेंटीना, फ्रान्स, मेक्सिको आणि जर्मनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरले आहे. आता त्यात भारताचीही भर पडण्याची शक्यता आहे. अर्जेंटीनामध्ये एका १२ वर्षांच्या मुलीने या खेळामुळे आत्महत्या केली होती.

व्हॉट्सअॅप मोमो नावाचा एक क्रमांक आहे. जो शेअर केला जात आहे. हा नंबर जोडल्यानंतर चित्रातील चेहरा धडकी भरवणारा दिसतो. हा नंबर आपल्या मोबईलमध्ये सेव्ह केल्यानंतर, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांवर आत्महत्या करण्यासाठी हळूहळू भाग पाडतात. मोमो नंबरला सर्वप्रथम फेसबुकवर पाहिले गेले, त्यानंतर अनेक लोकांनी दिलेल्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. बातम्यांनुसार, मोमो व्हॉट्सअॅप दिसणारा भितीदायक चेहरा एका जपानी संग्रहालयात ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे आहे. हे चॅलेंज अतिशय जोखमीचे असून ते पूर्ण न केल्यास मोमो युजरला ओरडते, इतकेच नाही तर शिक्षा देण्याची धमकीही देते.