पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर करोना लसीकरणाच्या धोरणावरुन टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप लसीकरणाच्या मुद्दयावरील माझ्या पत्राला उत्तर दिलेलं नाही, असे ममता यांनी गुरूवारी सांगितलं.

“मोफत लसीकरणाच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींकडून मला अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही. नवीन संसद आणि पुतळे बांधण्यासाठी २०,००० कोटी रुपये खर्च करत असताना लसीकरणासाठी ३०,००० कोटी का दिले जात नाहीत?”, असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

“पीएम केयर फंड कोठे आहे? मोदी देशातील तरुणांचा जीव धोक्यात का घालत आहेत? त्यांच्या नेत्यांनी कोव्हिड हॉस्पिटलला भेट दिली पाहिजे तर ते इथे येत आहेत. ते इथे येऊन कोव्हिड पसरवत आहेत,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

 

बुधवारी ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर ममता यांनी पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देत. “धन्यवाद नरेंद्र मोदीजी, पश्चिम बंगालचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या सतत पाठिंब्याची मी अपेक्षा करते. मी माझ्या पूर्ण समर्थनासह आशा व्यक्त करते, की एकत्रितपणे आपण करोना साथीच्या आणि इतर आव्हानांशी लढा देऊ आणि केंद्र-राज्यांच्या संबंधात नवीन आदर्श घालून देऊ”, असे म्हटले होते.