News Flash

बँकांकडून ‘काळ्या धंद्या’ची चौकशी सुरू

ग्राहकांकडील बेनामी पैसा गुंतवणूक तसेच विमा योजनांत गुंतवून तो कायदेशीर करण्याच्या कारवायांचा ‘स्टिंग ऑपरेशन’ने पर्दाफाश केल्यानंतर याप्रकरणी बँकांनी चौकशीस सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी

| March 17, 2013 12:10 pm

ग्राहकांकडील बेनामी पैसा गुंतवणूक तसेच विमा योजनांत गुंतवून तो कायदेशीर करण्याच्या कारवायांचा ‘स्टिंग ऑपरेशन’ने पर्दाफाश केल्यानंतर याप्रकरणी बँकांनी चौकशीस सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआयने या प्रकरणात १८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, तर अ‍ॅक्सिस बँकेनेही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, एचडीएफसी बँकेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका स्वतंत्र लेखापरीक्षण संस्थेची नियुक्ती केली आहे.
देशातील प्रमुख खासगी बँकांमध्ये काळा पैसा पांढरा करून देण्यात येत असल्याचे ‘कोब्रापोस्ट’ संकेतस्थळाने दोन दिवसांपूर्वी ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे उघड केले होते. या वृत्ताने अर्थजगतात खळबळ उडवली होती. या पाश्र्वभूमीवर बँकेच्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये, यासाठी एचडीएफसी बँकेने ‘डेलॉइट टच तोमत्सू’ या खासगी लेखापरीक्षण संस्थेद्वारे संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचा निर्णय जाहीर केला. याशिवाय बँकेने अमरचंद अ‍ॅण्ड मंगलदास तसेच सुरेश ए. श्रॉफ यांच्यामार्फत बँकेच्या आचारसंहिता व नैतिक मूल्यांना हानीकारक कृत्य घडले आहे का, याची चौकशी चालवली आहे. या प्रकरणात सकृद्दर्शनी दोषी आढळलेल्या २० अधिकाऱ्यांना चौकशी  पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.
अ‍ॅक्सिस बँकेने या प्रकरणी बँकअंतर्गत चौकशी सुरू केल्याचे सांगितले. तसेच बँकेच्या १६ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले. दरम्यान आयसीआयसीआय बँकेनेही आपल्या १८ कर्मचाऱ्यांना निलंबित करून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:10 pm

Web Title: money laundering allegation banks start probes
Next Stories
1 दिशादर्शक प्रणाली असलेला उपग्रह ‘इस्रो’ जूनमध्ये सोडणार
2 ‘टाइम’ संपादकपदी बॉबी घोष नियुक्त
3 प्रवेश परीक्षेतून चीनचा इंग्रजीला डच्चू
Just Now!
X