पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली.  २००५ ते २०१० या पाच वर्षांत वढेरा यांनी लंडनमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली होती. या मालमत्ता खरेदी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.

रॉबर्ट वढेरा यांनी ईडीसमोर हजर व्हावे, असाही आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. या आदेशानुसार बुधवारी वढेरा चौकशीसाठी उपस्थित राहिले. लंडनमधील १९ लाख पौंड इतकी किंमत असलेल्या मालमत्तेच्या खरेदी व्यवहारांसंदर्भात ईडीने वढेरा यांना चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी वढेरा हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. रात्री ८ वाजेपर्यंत ईडीने जबाब नोंदवला होता. गुरुवारी सकाळी वढेरा हे ईडीच्या जयपूरमधील कार्यालयात ते हजर झाले. वढेरा यांना तब्बल ४० प्रश्न विचारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी वढेरा यांचे सहकारी मनोज अरोरा यांच्या चौकशीत लाचखोरी आणि मालमत्ता खरेदी उघड झाल्याचे सक्तवसुली संचालनालयाचे म्हणणे आहे. या प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी ७ डिसेंबर रोजी दिल्ली, बंगळुरू येथील काही ठिकाणांवर तसेच वढेरा यांच्या दिल्लीतील कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते.