परदेशात ठेवण्यात येणाऱ्या काळ्या पैशांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने कडक पावले उचलल्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले असून, स्विस बॅंकेत भारतीयांकडून ठेवण्यात येणाऱ्या पैशामध्ये तब्बल एक तृतीयांश इतकी घट झाली आहे. स्विस बॅंकेत भारतीयांकडून १.२ अब्ज फ्रॅंक (सुमारे ८३९२ कोटी) इतकी रक्कम ठेवण्यात आल्याची माहिती बॅंकेकडून देण्यात आली आहे.
स्वित्झर्लंडमधील केंद्रीय बॅंकिंग प्राधिकरण स्विस नॅशनल बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार, २०१५ पर्यंत स्विस बॅंकेत भारतीयांकडून जमा करण्यात आलेली रक्कम ५९.७४ कोटी स्विस फ्रॅंकने घटली आहे. १९९७ पासून स्विस बॅंकेकडून परदेशातील नागरिकांनी स्विस बॅंकेत ठेवलेल्या पैशांची माहिती जाहीर केली जाते. त्यावेळेपासून भारतीयांकडून इतक्या कमी प्रमाणात पैसा स्विस बॅंकेत जमा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर सलग दुसऱ्या वर्षी स्विस बॅंकेत भारतीयांकडून जमा होणारा पैसा कमी झाला आहे.
सन २००६ च्या शेवटी स्विस बॅंकेत भारतीयांकडून जमा करण्यात आलेली रक्कम सर्वाधिक म्हणजे ६.५ अब्ज स्विस फ्रॅंक म्हणजे सुमारे २३ हजार कोटी रुपये इतकी होती. पण त्यानंतर दरवर्षी सातत्याने या आकड्यांमध्ये घटच झालेली पाहायला मिळाली.
काळ्या पैशांविरोधात केंद्र सरकारने उघडलेल्या मोहिमेला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन स्विस नॅशनल बॅंकेने दिले आहे. २०१८ मध्ये स्वित्झर्लंड या संदर्भात भारताबरोबर नव्याने करार करण्याची शक्यता आहे.