‘टाटा सन्स’चे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्री यांनी त्यांच्या कार्यकाळात कंपनीचा खर्च वाढल्याच्या आरोपावर पलटवार केला आहे. रतन टाटा वापरत असलेल्या विमानावर कंपनीने जास्त पैसे खर्च केले, असा आरोप मिस्री यांनी मंगळवारी केला आहे. माझ्यावर केलेले आरोप हे जनता आणि कंपनीच्या समभागधारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्यासाठी ऑफिसतर्फे खर्च करण्यात येत होता. त्यांच्या कार्पोरेट जेटसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. तसेच नीरा राडिया यांच्या वैष्णवी कम्युनिकेशन्सऐवजी अरुण नंदा यांच्या रिडिफ्युजन एडलमॅन या कंपनीची सेवा घेतल्यामुळे खर्च ४० कोटींवरून ६० कोटीपर्यंत पोहोचला, असेही सायरस यांनी नमूद केले आहे. मी अध्यक्ष होण्याच्या आधीच हा बदल झाला होता. टाटा सन्सतर्फे पब्लिक रिलेशन्स इन्फ्रास्ट्रक्चरसाठी करण्यात आलेला खर्चही रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा ट्रस्टला देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. २०१२-१३ मध्ये झालेल्या ८४ कोटींच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये कंपनीचा खर्च वाढून तो १८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला, असे गेल्याच आठवड्यात टाटा सन्सच्या वतीने सांगण्यात आले होते.