14 October 2019

News Flash

मोसमी पाऊस यंदा विलंबाने

केरळमध्ये ६ जून रोजी आगमनाचा हवामान खात्याचा अंदाज

(संग्रहित छायाचित्र)

केरळमध्ये ६ जून रोजी आगमनाचा हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : मोसमी पावसाला (मान्सून) यंदा पाच दिवस विलंब होणार असून त्याचे केरळमध्ये ६ जून रोजी आगमन होईल, असे बुधवारी भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने मोसमी पाऊस ४ जूनला केरळात येईल, असे म्हटले होते. दोन्ही संस्थांनी मोसमी पावसाच्या विलंबावर शिक्कामोर्तब केले आहे. केरळमध्ये दरवर्षी १ जून रोजी मोसमी पावसाचे आगमन होते. स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार मोसमी पाऊस केरळात ४ जून रोजी दाखल होईल. त्यात दोन दिवस पुढे मागे होऊ शकते.

भारतीय हवामान विभागाने एप्रिलच्या हवामान अंदाजात असे म्हटले होते, की मोसमी पाऊस हा ९६ टक्के या दीर्घकालीन सरासरीइतका असेल. सरासरीच्या खाली व सरासरी या दोहोंच्या मध्ये तो या वेळी असण्याची शक्यता आहे. स्कायमेटने मात्र या वेळी सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे.

वेळेआधी येऊनही पाऊसमान कमीच..

गेल्या वर्षी मोसमी पाऊस २९ मे रोजी केरळात आला होता, त्या वेळी तो नेहमीच्या १ जून या तारखेपेक्षा तीन दिवस अगोदर आला. तरी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला होता. २०१७ मध्ये मोसमी पाऊस ३० मे रोजी केरळात आला होता पण त्या वेळी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९५ टक्केच होता. याचा अर्थ तेव्हाचा पाऊसही सरासरीपेक्षा कमी होता.

भाकीत काय?

या वर्षी सांख्यिकी प्रारूपाच्या आधारे विचार करता मान्सून केरळात विलंबाने येणार असून नैर्ऋत्य मोसमी पावसाचे तेथील आगमन विलंबाने होत आहे. यात चार दिवस पुढे-मागे होऊ शकते. नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास परिस्थिती अनुकूल असून अंदमान निकोबार बेटांवर तसेच शेजारच्या आग्नेय बंगाल उपसागरात १८-१९ मे रोजी तो दाखल होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

First Published on May 16, 2019 3:05 am

Web Title: monsoon likely to arrive in kerala on june 6