यंदा भारतामध्ये मान्सूनला सुरूवातीच्या महिन्यांत अल-निनोचा फटका बसणार नाही. मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात शेवटच्या टप्प्यात अल-निनो सक्रिय होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्यातील वरिष्ठांच्या माहितीनुसार शेवटच्या टप्प्यातही अल-निनोचा प्रभाव फारसा जाणवणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या नियोजित कालावधीत पार पडण्याची शक्यता वाढली आहे.

सध्याच्या घडीला आपल्याला अल-निनोची चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. अल-निनोचा प्रभाव जुलैनंतर जाणवायला लागेल. याशिवाय, त्याचा मान्सूनवर परिणाम होईलच असे नाही. तो केवळ नैऋत्य मान्सूनवर प्रभाव टाकणाऱ्या अनेक घटकांपैकी एक असेल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के.जे. रमेश यांनी दिली.

भारतातील बहुतांश शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमधून भारतात प्रवेश करतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात राजस्थानमधून मान्सून माघारी जातो. काही दिवसांपूर्वी २०१४ व २०१५ नंतर ‘अल निनो’ परत येणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने दिला होता. ‘अल निनो’ परत आल्यास यंदाच्या वर्षी पाऊस कमी होण्याची भीती व्यक्त होत होती. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने देशभरातील शेतक-यांना फायदा झाला होता. शेतमालाचे विक्रमी उत्पादनही घेण्यात आले होते. मात्र आता पुन्हा पाऊस पाठ फिरवणार या भीतीने शेतकरी चिंतातूर झाले होते.

जगभरातील हवामान खात्यांनी यंदा अल निनो परत येणार असा अंदाज वर्तवला आहे. ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याने २८ फेब्रुवारी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार पॅसिफीक महासागरामध्ये अल निनोच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरणारी परिस्थिती दिसून आली आहे. पण भारतीय हवामान खात्याने भारतातील मान्सूनवर अल निनोचे परिणाम होणार नाही असे संकेत दिल्याने दिलासा मिळाला आहे.
प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने सामान्यपणे दक्षिण अमेरिकेकडून आशियाच्या दिशेने वाहणारे वारे मंदावतात. त्याचा भारतातील मोसमी पावसावर परिणाम होतो. अशा वेळी भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान आढळते. गेल्या १४० वर्षांत निम्म्याहून अधिक वेळा भारतातील प्रमुख दुष्काळांची वेळ अल निनोशी जुळून आली आहे.