केरळमध्ये मान्सून २९ मे रोजी धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. घामाच्या धारांनी हैराण झालेल्यांसाठी ही बातमी नक्कीच आल्हाददायक आहे. केरळमध्ये दरवर्षी १ जून पर्यंत मान्सून धडकतो. यावर्षी मात्र तीन दिवस आधीच मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढेच नाही तर येत्या तीन ते चार दिवसात उत्तर आणि पश्चिम भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील काही ठिकाणी पाऊस पडल्याच्या बातम्या आल्या आहेत. अशात यावर्षी वेळेच्या तीन दिवस आधीच मान्सून बरसणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर त्यापुढील २४ ते ४८ तासांत त्याची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या खाडी परिसरात होते. महाराष्ट्रात २ ते ३ जून पर्यंत मोसमी पाऊस होऊ शकतो असा अंदाज गेल्या वर्षीच वर्तवण्यात आला होता. केरळमध्ये जर मान्सून वेळेआधी दाखल होतो आहे तर महाराष्ट्रात कधी येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.