सात दिवसांच्या विलंबानंतर केरळात मोसमी पाऊस दाखल
नैऋत्य मोसमी पावसाचे केरळात सात दिवसांच्या विलंबाने आगमन झाले आहे. साधारणपणे १ जूनला मोसमी पाऊस केरळात येतो पण यावेळी तो उशिरा आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा तिरुअनंतपूरमच्या प्रादेशिक हवामान केंद्राने केली आहे. या आधीच्या वृत्तानुसार मोसमी पाऊस ९ जूनला केरळात येईल असे सांगण्यात आले होते. या पावसात भूस्खलनात एकाचा मृत्यूही ओढवला आहे.
तिरुअनंतपूरम येथील हवामान केंद्राचे प्रमुख के. संतोष यांनी नैऋत्य मोसमी पाऊस केरळ व लक्षद्वीपमध्ये स्थिर झाल्याचे सांगितले. मान्सूनने तामिळनाडूच्या अनेक भागांत आगेकूच केली असून कर्नाटकचा दक्षिण भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग येथेही मान्सूनची प्रगती झाली आहे. केरळच्या अनेक भागात मंगळवारी रात्री मोसमी पाऊस सुरू झाला. त्यात इडुक्की जिल्ह्य़ातील ‘एसएफआय’ संघटनेचे अध्यक्ष जोबी जॉन हे घरावर ढिगारा व दरडी कोसळून मृत्युमुखी पडले आहेत. त्यांची आई या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली आहे.
केरळात मोसमी पाऊस स्थिर होण्याबाबत हवामान विभाग तीन निकष लावत असतो त्यात १४ हवामान केंद्रांवरील पावसाचे मोजमाप विचारात घेतले जाते. गेल्या ४८ तासांत केरळात सर्वदूर पाऊस झाला असून ७ व ८ जूनला ६० टक्के केंद्रांवर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिमी व नैऋत्य वारे दक्षिण अरबी समुद्रात ताशी ३०-४० कि.मी वेगाने वाहात असून साडेचार किलोमीटरच्या पट्टय़ात हा परिणाम दिसत आहे.

कोकणात पूर्वमोसमी सरी
महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनाबाबत निश्चित वेळ देण्यात आली नसली तरी मंगळवारपासूनच दक्षिण कोकणातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या आहेत. बुधवारी सकाळच्या नोंदीनुसार मुळदे येथे १२९ मिमी, कुडाळ येथे ८२ मिमी तर दोडामार्ग येथे ६३ मिमी पाऊस पडला. पुढील पाच दिवसात रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये काही भागांत मुसळधार पाऊस पडणार असून रायगड, ठाणे मुंबई या उत्तर कोकणात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.