हिंदी महासागरात मोठय़ा प्रमाणात तपमानवाढ होत असल्याने गेल्या शतकात मध्य-पूर्वेकडे व उत्तर भारतात उन्हाळी मान्सूनचा पाऊस कमी होत गेला, असे पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेच्या (आयआयटीएम) वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात म्हटले आहे. उन्हाळी मान्सूनचा पाऊस १९०१-२०१२ या दरम्यान पाहिला असता दक्षिण आशियात पावसाचे प्रमाण कमी होताना दिसले आहे. मध्य-पूर्व तसेच भारताच्या उत्तरेकडील भागात विशेष करून गंगा-ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात व हिमालयाच्या पायथ्याशी पाऊस कमी होत चालल्याचे दिसते. डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल यांनी हे संशोधन केले असून, ते नेचर कम्युनिकेशन या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
भारतात गंगेच्या पठारी भागात लोकसंख्या जास्त आहे. तेथे शेती अजूनही पावसावर अवलंबून असली, तरी पावसाचे प्रमाण कमी झाले असून ही बाब सामाजिक व आर्थिक जीवनमानास हानिकारक आहे, असे कॉल यांनी सांगितले. वैज्ञानिकांनी हिंदी महासागरातील तपमानवाढीचा विशेषत: पश्चिमेकडील तपमानवाढीचा परिणाम मान्सूनच्या पावसावर कसा होतो यावर संशोधन केले आहे. ते शतकातील आकडेवारीवर आधारित असून, हिंदी महासागराच्या तपमानवाढीने व भारतीय उपखंडाच्या कमी तपमानाने महासागर व जमीन यातील तपमानातील फरक बिघडला त्यामुळे आग्नेय आशियातील मान्सूनवर परिणाम झाला. जागतिक तपमानवाढीमुळे मान्सूनचे घटक वाढून पाऊस पडतो. मान्सूनमध्ये जमीन व समुद्र यांच्यातील तपमानफरकामुळे उपखंडात मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण होते. पूर्वीच्या संशोधनानुसार उत्तर अर्धगोलार्धातील जमीन सागरापेक्षा लवकर तापत होती व त्यामुळे मान्सूनचा पाऊस जोरात होत असे. सागरी पृष्ठभागाच्या वाढत्या तपमानमुळे वातावरणात आद्र्रता जास्त तयार होते. कारण बाष्पीभवन वाढते व बाष्पधारण क्षमता वाढते. जमीन-सागर यांच्या वाढत्या तपमान फरकामुळे व आद्र्रतेमुळे मान्सूनचा पाऊस वाढायला पाहिजे. यापूर्वीच्या अभ्यासाच्या नेमके विपरीत निरीक्षण नोंदण्यात आले असून त्यानुसार दक्षिण आशियात जमीन व सागरी औष्णिक फरक गेल्या काही दशकांत कमी झाला. जमीन व सागर यांच्या तपमानात फरक कमी होत गेले. त्याला हिंदूी महासागरातील तपमानवाढ कारण आहे.
हरितगृह वायूंमुळे हिंदी महासागराचे तपमान वाढत जाईल व त्यामुळे मान्सूनचा जोर कमी होईल असा अंदाज आहे. आयआयटीएमचे वैज्ञानिक कॉल यांनी सांगितले, की भारत-फ्रेंच सहकार्याने हे संशोधन करण्यात आले आहे. त्यात आयआयटीमचे वैज्ञानिक रितिका कपूर, अशोक कारूमुरी व बी.एन. गोस्वामी, रघू मुरतुगुडे, पास्कल टेरी यांचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय उपखंड कोरडा का ?
हिंदी महासागरातील तपमान वाढ पश्चिमेकडे गेल्या शतकात १.२ अंश सेल्सियस झाली आहे, ती इतर उष्णकटीबंधीय महासागरापेक्षा जास्त असून हिंदी महासागरातील तपमान वाढीने मान्सूनला अनुकूल स्थिती कमकुवत झाली व  विषुवृत्तीय भागात गरम ओलसर हवा वर जाऊ लागली. त्यामुळे संवहन व पाऊसही कमी झाला, हिंदी महासागरातील तपमानवाढीने सागरी भागात पाऊस वाढला पण त्या बदल्यात भूभागावर पडणारा पाऊस कमी झाला, त्यामुळे भारतीय उपखंड कोरडा राहू लागला असे कॉल यांचे मत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon reduction due to temperature increased in indian ocean
First published on: 17-06-2015 at 01:36 IST