07 March 2021

News Flash

पावसाळी अधिवेशन कामकाजाविना

ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस व डाव्या पक्षांच्या मूठभर सदस्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरल्याने संसदेचे संपूर्ण पावसाळी अधिवेशन कामकाजविना संपले.

| August 14, 2015 03:44 am

ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस व डाव्या पक्षांच्या मूठभर सदस्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरल्याने संसदेचे संपूर्ण पावसाळी अधिवेशन कामकाजविना संपले.
अधिवेशनाचा गुरुवारचा शेवटचा दिवसही कोणत्याही कामकाजाविना मावळला. गेल्या २४ दिवसांपासून संसदेत सुरू असलेली भाजप-काँग्रेसची लढाई आता रस्त्यावर आली आहे. ललित मोदींवरून सुरू असलेला वाद आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी असा रंगला आहे. ललित मोदी हे राजकारणी व काळ्या पैशांना जोडणारा दुवा आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी घाबरत असल्याची खणखणीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष पुन्हा आणीबाणीच्या कालखंडासारखा वागत असल्याचे ठोस प्रत्युत्तर दिले. काँग्रेसला केवळ (गांधी) परिवाराला तर भाजपला देशाला वाचवायचे आहे, अशा शब्दात मोदी यांनी राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर शरसंधान केले. गुरुवारी सकाळपासून काँग्रेस सदस्यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या आसनासमोर येत घोषणाबाजी सुरू केली. मात्र महाजन यांनी न जुमानल्याने त्यांनी सभात्याग करून संसद परिसरात निदर्शने सुरू केली. काँग्रेसवर आडमुठेपणाचा आरोप करीत रालोआ सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात विजय चौक ते संसद भवन मोर्चा नेला. एकीकडे काँग्रेसविरोधात रस्त्यावर उतरलेले रालोआ खासदार, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला आव्हान दिले. ‘तुम्ही मतदारसंघ सांभाळा; मी काँग्रेसला सांभाळतो’, अशा शब्दात मोदींनी ‘काँग्रेसमुक्त भारता’च्या दुसऱ्या टप्प्याचे सुतोवाच रालोआ घटक पक्षांच्या बैठकीत केले. दोन दिवसांपासून राहुल गांधी यांच्यावर उपरोधिक टीका करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पुन्हा त्यात भर टाकली. राहुल यांना संसदेतील भाषण व निवडणुकीतील घोषणांमधील अर्थ अद्याप समजत नसल्याचा टोमणा त्यांनी लगावला.

काँग्रेसच्या ४४ आणि डाव्या पक्षांच्या ९ खासदारांच्या मतदारसंघात एक केंद्रीय मंत्री आणि चार खासदार जनसभा घेतील. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी असंसदीय आचरण करून विकासकामे ठप्प पाडल्याचा प्रचार या सभांमधून केला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 3:44 am

Web Title: monsoon session of parliament end without any work
Next Stories
1 ‘माझा आता विवाह होण्याची शक्यताच नाही’
2 बगदादमधील बॉम्बस्फोटात ६७ जणांचा मृत्यू
3 गोदामातील स्फोटात चीनमध्ये ५० ठार
Just Now!
X