संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार असून, ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी ही माहिती दिली. अधिवेशनाची तारीख आणि कालावधी निश्चित करण्यासाठी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली संसदीय व्यवहार मंत्रिगटाची बैठक झाली. त्यामध्ये अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपला सत्ता मिळवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर केरळमध्येही पक्षाची कामगिरी सुधारली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मनोबल वाढले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारला मे महिन्यात दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षामध्ये देशामध्ये बदल होऊ लागल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात या दोन्ही घडामोडींचे प्रतिबिंब उमटणार हे निश्चित आहे.
राज्यसभेमध्ये सध्या ४५ विधेयके प्रलंबित आहेत. तर लोकसभेमध्ये पाच विधेयके प्रलंबित आहेत. ती मंजूर करून घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार, हे निश्चित आहे. त्यातही वस्तू व सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी सरकार अधिक प्रयत्नशील असणार आहे.