उन्हाचा कडाका आणि दुष्काळाची दाहकत सोसत असलेल्या देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला. मान्सूनचा हा पहिलाच अंदाज असून, मान्सूनचे आगमन कधी होईल हे मे महिन्याच्या मध्यात सांगता येईल, असे हवामान विभागाचे महासंचालक एल. एस. राठोड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मान्सूनचा सुधारित अंदाज पुढील महिन्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने पावसाळ्यापूर्वी वर्तविला होता. पण प्रत्यक्षात सरासरीच्या ८६ टक्केच पाऊस पडल्यामुळे देशातील दहापेक्षा अधिक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ अनेक नागरिकांवर ओढवली आहे. या स्थितीत यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच खूशखबर आहे.
यंदाचा मान्सून १०४ ते ११० टक्क्यांच्या दरम्यान राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. कार्यात्मक पद्धतीने सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पाऊस सरासरीपेक्षा जास्त असल्याने महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यात सध्या तीव्र दुष्काळ आहे. गेल्यावर्षी देशात सरासरीच्या १४ टक्के कमी पाऊस झाला होता. यंदा तो सरासरीच्या सहा टक्के जास्त होण्याचा अंदाज आहे.
नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीवर ‘एल निनो’चा प्रभाव पडतो. यंदा ‘एल निनो’चा प्रभाव कमी होत असून, त्याचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. देशात सर्वत्र चांगला पाऊस पडण्याची शक्यता असून, कोणत्या विभागात किती पाऊस पडू शकतो, याचा अंदाज पुढील महिन्यात वर्तविण्यात येईल. मान्सूनच्या वाटचालीवर प्रभाव टाकणाऱ्या अनेक घटकांचा अभ्यास करून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.