अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत असतानाच यंदा सरासरीच्या ९३ टक्केच पाऊस पडण्याचा अंदाज बुधवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला. या अंदाजामुळे शेतकऱयांच्या चिंतेत अधिकच भर पडणार असून, सर्वसामान्य नागरिकांनाही याचा फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
दरवर्षी हवामान विभागाकडून मान्सूनचा अंदाज वर्तविला जातो. यंदाचा पहिला अंदाज बुधवारी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. यामध्ये यंदाच्या मान्सूनवर एल-निनोचा परिणाम होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. देशातील मान्सूनच्या सरासरीच्या ९३ टक्के पाऊस यंदा पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता २८ टक्के असून, सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३३ टक्के असल्याचे या अंदाजात वर्तविण्यात आले आहे. त्याचवेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची अजिबात शक्यता नाही, असेही सांगण्यात आले आहे. देशाच्या कोणत्या भागात कसा पाऊस पडेल, याचा अंदाज पुढील महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.