वॉशिंग्टन : मानवाच्या चांद्रविजयाला आज (शनिवारी) ५० वर्षे पूर्ण होत आहेत. २० जुलै १९६९ रोजी मानवाने चांद्रविजय मिळवला, तेव्हा ते अज्ञाताच्या प्रांतातील सर्वात मोठे पाऊ ल होते. मानवाच्या या अभूतपूर्व विजयाचा सोहळा जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जात असून, समाज माध्यमांमध्ये देखील त्या महत्त्वपूर्ण क्षणांना उजाळा दिला जात आहे.

एडविन बझ अल्ड्रिन, नील आर्मस्ट्राँग आणि मायकेल कॉलिन्स यांना घेऊन जाणारे अपोलो ११ यान १६ जुलै १९६९ रोजी चंद्रावर निघण्यास सज्ज झाले तेव्हा दहा लाख लोक साशंक मनाने हे उड्डाण पाहण्यास जमले होते. सर्वच खंडांमध्ये अमेरिकेच्या चंद्रवारीचे कुतूहल होते. साहित्यिक, कवी आणि चित्रकर्त्यांना या विषयाने बरेच खाद्य पुरविले. या मोहिमेच्या यशस्वीतेनंतरही ती खोटी असल्याचे षड्यंत्र सिद्धांत कित्येक वर्षे लढविले गेले. मात्र सर्वच षड्यंत्र सिद्धांतांना मागे टाकत मानवतेच्या उत्तुंग झेपेची पन्नाशी आज साजरी केली जात आहे. त्याचबरोबर आर्टेमिस कार्यक्रमाअंतर्गत पुन्हा चांद्रमोहीम आखली जात आहे. आता चीन चंद्रावर माणूस पाठवण्याच्या तयारीत असल्याने अमेरिकेलाही पुन्हा चंद्रावर माणूस पाठवण्याची घाई झाली आहे.

अडचणींवर मात..

‘अपोलो ११’ मोहिमेचा प्रवास पहिले चार दिवस तर ठरल्याप्रमाणे झाला, पण यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची २० मिनिटे ही थरारक होती. यानाला अनेक संकटातून जावे लागत असताना नियंत्रण कक्षातील वातावरण तणावाचे बनले होते. सगळ्या  जगाच्याच नजरा या मोहिमेवर होत्या, कारण मानवी समुदायाचीच ती कसोटी होती. चंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर काही काळ यानाचा ह्य़ूस्टन येथील कक्षाशी रेडिओ संपर्क  तुटला तेव्हा सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके चुकले. त्यानंतर  ‘ईगल’ हे यान चंद्रावर उतरण्याच्या मधल्या टप्प्यावर असल्याचे समजले. यान एडविन बझ अल्ड्रीन चालवत होते, तर मिशन कमांडर होते नील आर्मस्ट्राँग. त्या वेळी धोक्याची घंटी वाजली, कारणही तसेच होते; ईगल यान त्याच्या कोलंबिया या मुख्य यानापासून दोन तास आधीच वेगळे झाले होते. मायकेल कॉलिन्स हे चंद्राच्या कक्षेत फिरत होते.

आर्मस्ट्राँग यांच्यासाठी हा अतिशय घालमेलीचा व जीवनमरणाचा क्षण होता. आर्मस्ट्राँग यांनी नियंत्रण कक्षाला कळवले, की आता आम्ही काय करायचे ते कळवा, ह्य़ुस्टन येथून संदेश गेला की, धीर सोडू नका, फिरत राहा. यान फिरत होते, चंद्रावरील विवरे वेगाने मागे पळताना दिसत होती. आर्मस्ट्राँग यांना लक्षात आले, की या वेगाने जर यान चालले तर जिथे उतरायचे त्याच्या अनेक मैल आपण दूर जाऊ . त्यांनी लगेच शिताफीने निर्णय घेतला, तो मानवी पातळीवर यानाचे नियंत्रण करण्याचा. त्यांनी यानाच्या पोर्टहोलमधून खाली बघत उतरण्यासाठी नवी जागा शोधायला सुरुवात केली, पण उतरण्यासाठी योग्य ठिकाण सापडत नव्हते. अतिशय कसोटीचा असा क्षण होता. अल्ड्रीन यांनी आर्मस्ट्राँग यांना यानाचा वेग व उंची सांगितली. यान योग्य पद्धतीने खाली येत आहे असे ते म्हणाले. पण नंतर दुसरीच समस्या आली. यानातील इंधन संपायला आले होते. ह्य़ुस्टन येथील नियंत्रण कक्षाने यान उतरण्यास २० सेकंदांचा अवधी उरला आहे असे सांगितले व इंधन संपण्यास ३० सेकंद उरली होती. हे गणित जमले नाही तर मोहीम अपयशी ठरणार होती. आर्मस्ट्राँग हे एवढे सगळे घडतअसताना शांत होते, त्यांचे चित्त विचलित झाले नव्हते. त्यांचा तो आत्मविश्वास सार्थ ठरला, यान चंद्रावर उतरले. यान उतरल्यानंतर काही सेकंदातच संवेदकाचा लाइट लागला. इंजिने बंद करण्यात आली. ह्य़ुस्टन.. ‘ट्रान्क्वि लिटी बेस हिअर, द ईगल हॅज लँडेड’ चंद्रावरून रेडिओ संदेश गेला. आर्मस्ट्राँग यांना त्या वेळी खूप अभिमान वाटत होता. पृथ्वीवरील कॅप्सूल संदेशकार चार्ली डय़ुक यांनी संदेश पाठवला, या वेळी ‘आम्ही तुमची पृथ्वीवर नक्कल करीत आहोत. आम्हीही श्वास रोखून होतो आता आम्ही पुन्हा श्वास घेणे सुरू केले आहे.’

मोहिमेचा आरंभ..

या सगळ्या थरारक कहाणीची सुरुवात १९६१ मध्येच झाली होती. रशियाचा स्पुटनिक उपग्रह जेव्हा घिरटय़ा घालू लागला, तेव्हा त्याची टिकटिक अमेरिकेला अस्वस्थ करीत होती. अमेरिकी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन यांना बोलावून घेतले, आपण रशियाला अवकाश स्पर्धेत मागे टाकायला हवे अशा आशयाची त्यांची चर्चा झाली. लिंडन जॉन्सन नासाचे अवकाश कार्यक्रमप्रमुख वेर्नहेर व्हान ब्राऊ न यांच्याकडे गेले. ब्राऊ न हे नाझी होते व त्यांनी व्ही २ रॉकेटचा शोध लावलेला होता. त्याच अग्निबाणाने दुसऱ्या महायुद्धात लंडनची हानी केली होती. युद्धअखेरीस ते अमेरिकेला शरण गेले, नंतर ब्राऊ न व त्यांच्या शेकडो अभियंत्यांना अलाबामा येथे आणले गेले. त्यांना एक गुप्त मोहीम दिली होती, ‘ऑपरेशन पेपरक्लिप’. ब्राऊ न यांनी जॉन्सन यांना सांगितले, की आज अमेरिका मागे आहे हे खरे, पण आपण रशियनांना मागे टाकू  शकतो. पण त्यासाठी मोठा बूस्टर अग्निबाण तयार करण्याचे काम तातडीने सुरू करावे लागेल. त्यानंतर आठ वर्षांनी रिचर्ड निक्सन हे अमेरिकेचे अध्यक्ष असताना हे स्वप्न पूर्ण झाले. ऑक्टोबर १९६८ ते मे १९६९ दरम्यान अपोलो मोहिमेची चार चाचणी उड्डाणे झाली. आर्मस्ट्राँग यांची निवड डिसेंबर १९६८ मध्ये करण्यात आली. आर्मस्ट्राँग यांनी अल्ड्रीन यांना असे सांगितले होते, की बहुदा मीच चंद्रावर पहिले पाऊ ल ठेवणार आहे.

प्रत्यक्ष प्रवास..

नासाचे अवकाश कार्यक्रम प्रमुख वेर्नहेर ब्राऊ न यांनी महाकाय अग्निबाण तयार केला होता, त्याच्या मदतीने अपोलो ११ यान १६ जुलै १९६९ रोजी उड्डाणास सज्ज झाले. किमान दहा लाख लोक यानाचे उड्डाण पाहण्यास जमले होते. पण अनेकांच्या मनात माणूस चंद्रावर उतरू शकेल याबाबत शंकाच होती. अमेरिकेतील लोकांसाठी यानाचे अवतरण रविवारी सायंकाळी सुरू झाले होते. युरोपात त्या वेळी रात्र होती. पण प्रत्येक जण दूरचित्रवाणी संचाला चिकटून होता. त्यांना काहीतरी विचित्र रेडिओ संदेश ऐकू येत होते. आर्मस्ट्राँग यांनी त्यांचा कृष्णधवल कॅमेरा त्यांच्या पावलापुढे धरला, तोपर्यंत पृथ्वीवर काहीच समजत नव्हते. शिडीवरून उतरून त्यांनी पाऊ ल चांद्रभूमीवर ठेवले, त्या वेळी ईगल यानाचे फूटपॅड जमिनीत दोन इंच खोल रुतले होते. चंद्राचा पृष्ठभाग तर विलोभनीय होता. तेथील माती वेगळीच होती. आर्मस्ट्राँग यांनी नंतर रेडिओ संदेशात सांगितले, की सगळे ठीक आहे.

आता मी ल्युनर मॉडय़ुलमधून उतरून पहिले पाऊ ल चंद्रावर ठेवत आहे. मानवासाठी हे छोटे पाऊ ल आहे, पण मानवतेसाठी एक उत्तुंग झेप. (वन स्मॉल स्टेप फॉर मॅन, वन जायंट स्टेप फॉर मनकाइंड)’ नासाने संग्रहित केलेल्या इतिहासात आर्मस्ट्राँग यांनी २००१ मध्ये म्हटले होते, की जे वाक्य मी उच्चारले ते योग्य प्रकारे नोंदले गेले नाही. पृथ्वीवर आल्यानंतर ते मला जाणवले,  ‘अ मॅन’ असा शब्द हवा होता पण त्यात व्याकरणाच्या चुका झाल्या.’ आर्मस्ट्राँग यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना ‘माणसाचे एक पाऊल व मानवतेची उत्तुंग झेप’ असाच अर्थ अभिप्रेत होता. पण ते वाक्य नीट ऐकू  आले नसावे. मानवी खुणा ठेवून पुन्हा कोलंबिया या मुख्य यानाला जोडले गेले व परतीचा प्रवास सुरू झाला.

२४ जुलै रोजी यान पृथ्वीच्या कक्षेत परत आले, आकाशात अग्निकल्लोळ दिसला, नंतर तिघा चांद्रवीरांनी पॅराशूट उघडले व सहजपणे पॅसिफिकमध्ये उतरले. तीन आठवडय़ांनी त्यांची पहिली पत्रकार परिषद झाली, ते तिघेही जगाचे नायक ठरले होते. त्यात त्यांना असे विचारण्यात आले होते की, तुम्ही पुन्हा चंद्रावर जाण्याचा विचार केला आहे का, त्यावर त्यांनी पुन्हा चंद्रावर जाण्याची इच्छा नाही असे म्हटले होते. त्यानंतर आणखी सहा मोहिमा त्यानंतर झाल्या, १९७२ मध्ये अपोलो मोहीम बंद करण्यात आली. आता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नासाला चांद्रमोहिमा सुरू करण्यास सांगितले आहे. पण तऱ्हेवाईक स्वभावानुसार त्यांनी अलीकडेच असे विधान केले होते, की मी चांद्रमोहिमा सुरू करा असे म्हटले नाही, तर मंगळ मोहिमेबाबत बोललो होतो.

पहिला चंद्रानुभव..

चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर  ‘माणसाचे एक पाऊल आणि मानवतेची उत्तुंग झेप’ असे उद्गार नील आर्मस्ट्राँग यांनी काढले होते. जवळून चंद्र कसा दिसतो असे विचारले असता ते म्हणाले होते की, चंद्राचा रंग सूर्याशी असलेल्या कोनाबरोबर बदलतो. तो तपकिरी, करडा, कोळशासारखा काळा असा बदलत जातो. तेथे गुरुत्वाकर्षणही कमी आहे. एडविन बझ अल्ड्रिन म्हणाले होते की तेथे धावताना अगदी संथ गतीने मी विहरतो आहे असे वाटत होते. अडीच तासात आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावरील त्यांच्या नजरेत आलेले काही खडक उचलले, काहींची छायाचित्रे टिपली. त्यांनी तेथे अमेरिकेचा झेंडा फडकवला. मानवतेच्या खुणा असलेल्या अनेक वस्तू मागे ठेवल्या. युरी गागारिन या पहिल्या अवकाशवीराचे सन्मान करणारे पदक तेथे ठेवले.