उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका ४५ वर्षीय वॉर्डबॉयने करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसऱ्या त्यांचा दिवशी मृत्यू झाला. लस घेतल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे अद्याप अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. टाइम्सनाऊने याबाबत वृत्त दिलं आहे.

महिपाल सिंह (४५) असं मृत्यू झालेल्या वॉर्डबॉयचं नाव असून शनिवारी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लस घेतल्यानंतर त्यांना लगेचच त्रास व्हायला लागला. नाईट ड्युटी संपल्यानंतर त्यांना छातीत दुखणे, श्वास घेण्यात त्रास होणे त्याचबरोबर कफचा त्रास जाणवू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

आणखी वाचा- COVID-19 Vaccination: देशात ४४७ जणांमध्ये दिसले लसीचे साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल; नगरमध्येही आठ जणांना लसीचा त्रास

महिपाल यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की, “लस घेण्यापूर्वीच त्यांना काहीसा त्रास होत होता. पण, लस घेतल्यानंतर त्यांची तब्येत खूपच बिघडली.” दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “महिपाल यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचे शवविच्छेदन केले जणार आहे.”

दरम्यान, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं की, लस घेतल्यानंतर ५१ जणांमध्ये नॉर्मल तर एकामध्ये गंभीर साईड इफेक्ट झाल्याचे दिसून आले. या २२ वर्षीय तरुणाची लस घेतल्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्याला एम्सच्या आयसीयूत दाखल करण्यात आले. तसेच कोलकात्यात एका ३५ वर्षीय नर्सला लस घेतल्यानंतर आयसीयूत दाखल करण्यात आले. यावर काही वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, “लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडण्याचे हे अॅलर्जीक रिअॅक्शनचे प्रकार आहेत. त्यामुळे लसींपासून त्यापासून घाबरण्याचे कारण नाही.”