कंपनी मालकांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या! कंपनी वृद्धिंगत करायची इच्छा असेल तर महत्त्वाच्या पदांवर नवोदितांची भरती करण्याऐवजी माजी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करा. ते जास्त लाभदायी कमी धोक्याचे ठरेल. कारण माजी कर्मचाऱ्यांना कंपनी ध्येयधोरणांची अधिक सखोल माहिती असते आणि कंपनीची कार्यशैली आणि संस्कृती ते जाणून असतात!!
ही कोण्या कर्मचारी संघटनेची सूचना नाही, तर नव्या संशोधनात महत्त्वाचा मुद्दा उजेडात आला आहे. इलिनॉइस विद्यापीठातील विशेषज्ञांनी मिळून केलेल्या दोन अभ्याससत्रांत सर्व प्रकारच्या संघटनांनी कंपनीतील माजी कर्मचाऱ्यांचे कौशल्य ध्यानात घेऊन त्यांना महत्त्वाच्या पदांवर नव्याने सहभागी करून घेतले आहे. यात इन्फन्ट्रीतील सैनिक ते मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यावसायिक बास्केटबॉलपटूंचा यात समावेश आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात महत्त्वाच्या पदांवर पर्यायी आणि सक्षम कर्मचारी नेमणे ही कंपनी व्यवस्थापनासमोरील महत्त्वाची जबाबदारी असते. ती योग्यरीत्या पार पाडायची झाल्यास आणि या कामी त्याला देण्यात येणारा मोबदला लक्षात घेता कंपनीतील माजी कर्मचाऱ्याला प्राधान्य देण्यात आल्याचे या अभ्यासात आढळून आले.  अर्थात या कर्मचाऱ्यांना कंपनीची ध्येयधोरणे उत्तमरीत्या ठाऊक असतात. म्हणजे त्यांना ‘बूमरँग’ म्हणून कमी दर्जा देण्यापेक्षा त्यांना कंपनीच्या कार्यशैलीत सामावून घेतल्यास ते कंपनीच्या नफ्यात आपला वाटा देऊ शकतात. माजी कर्मचाऱ्यांना कंपनीची कार्यशैली माहित असते. त्यामुळे नवोदितांना सामील करून घेण्यात जो धोका संभवतो, तो माजी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत कमी आढळतो, असे कर्मचारी आणि रोजगारसंबंधी संशोधन करणारे प्रा. टी ब्रॅड हॅरीस यांनी स्पष्ट केले. ‘पर्सोनेल सायकोलॉजी’ या नियतकालिकात अभ्यास अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात अनेक आघाडय़ांवर माजी कर्मचारी हे नवोदितांपेक्षा अधिक कुशल व सक्षम असल्याचे हॅरीस यांना जाणवले.

दगडापेक्षा वीट मऊ
 कंपनी कार्यशैलीची जाण, कंपनी ध्येयधोरणांविषयी अधिक ठाम, याशिवाय आधीची कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत गेल्यानंतर दगडापेक्षा वीट मऊ किंवा हीच परिस्थिती त्या कर्मचाऱ्याला उलट करून पाहता येईल. म्हणजे त्याला दुसऱ्या कंपनीत काही त्रुटी आढळल्यास तिच्यापेक्षा आपली पहिली कंपनी बरी, याचा अंदाज आलेला असतो. म्हणून तो अधिक संघटन लक्ष्यी होतो, म्हणजेच कंपनीच्या ध्येयधोरणांशी निगडित काम करत असतो, असे हॅरीस यांनी आपल्या अभ्यासात नमूद केले आहे.