कलिना येथील ग्रंथालयाची इमारत बांधकामाचे कंत्राट देण्याच्या बदल्यात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना मिळालेल्या कथित मोबदल्याप्रकरणी येत्या एक महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्याचबरोबर नवी मुंबई येथील गृह प्रकल्पाच्या घोटाळ्यात छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांच्याविरोधातही विशेष न्यायालयात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असेही उच्च न्यायालयात सांगण्यात आले.
भुजबळांसह १७ जणांवर आरोपपत्र
आम आदमी पक्षाकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठात सुनावणी सुरू आहे. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पैशांची अफरातफर आणि जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. कलिना प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, एक महिन्याच्या आत या प्रकरणात आरोपपत्र सादर करण्यात येईल, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली.
नवी दिल्ली येथील ‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छगन भुजबळ यांच्यासह १७ जणांवर अखेर नऊ महिन्यांनी बुधवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले. हे आरोपपत्र तब्बल २० हजार पानांचे असून, एकूण ६० साक्षीदारांची नावे त्यात आहेत. राजकीयदृष्टय़ा प्रभावी असलेले भुजबळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने ‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणात विकासकाला ८० टक्के इतका फायदा करून देऊन सरकारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप त्यात आहे.